अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

नवं क्षितिज !


माणसाचा एकूण इतिहास हा शोषणाचा इतिहास आहे. कायम कोणीतरी कोणाचं शोषण करत आलेला आहे. ज्याला आपण इतिहास म्हणतो, ती आपली संस्कृती असते आणि आपली संस्कृती ही शोषणाची संस्कृती आहे. खरंतर समाज हा आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्वं करत असतो. या समाजात ज्या काही रचना आपल्याला दिसून येतात, त्याच्या मुळाशी शोषण आहे हे काही बुद्धिवादी लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या रचनांना छेद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ही शोषण संस्कृतीची पाळंमुळं उखडता आली नाहीत, हे आपलं दुर्दैव !

आपल्या घटनेत समता या तत्वाचा उल्लेख आहे. हो हो, केवळ उल्लेख ! खरंतर शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, म्हणून घटनाकारांनी हे तत्व घटनेत नमूद केलं. मात्र, आपल्या स्वार्थी राजकारण्यामुळे घटनाकारांचं हे स्वप्न पूर्णत्वास आलं नाही. आपल्या समाजिक रचना ह्या प्रचंड  विषमतावादी असून त्यातून कायम एक वर्ग दुसऱ्या कुठल्यातरी वर्गाचं कायम शोषण करत असतो. महत्वाचं असं की, ही सामाजिक विषमता मानवनिर्मित सांस्कृतिक गोष्ट आहे हे आपण ध्यानातचं घेत नाही. काही लोकं या विषमतेचे समर्थन करण्यासाठी म्हणतात की, निसर्गातच विषमता आहे आणि माणूस हा निसर्गाचाच एक घटक आहे. मग ते अन्नसाखळीच उदाहरण देतात. म्हणजे, अन्नसाखळीत कसं गवताला उंदीर खातो, उंदराला साप खातो, सापाला गरुड खातो... अगदी तसंच,  हे लोक सामाजिक विषमतेता ही देखील नैसर्गिक गोष्ट आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आणि ते लोकं हेच शोषणकर्ते असतात हे आपल्या लक्षात देखील येत नाही. नाहीतर ते असं, असंबंध बोललेच नसते. किंवा ते अज्ञानमुळे असं काहीतरी बोलत असतात. मात्र, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, नैसर्गिक विषमतेचे स्वरूप हे वेगळं असून सामाजिक विषमता ही मानव निर्मित बाब आहे. सामाजिक विषमतेचे समर्थन करण्यासाठी नैसर्गिक विषमेचं उदाहरण देणं हे चूक आहे.


समाजात ज्या काही रचना आहेत त्या सगळ्या रचना ह्या शोषणाच्या आहेत. रचनांची निर्मिती ही गरजेतून होत असते. मग ती धार्मिक रचना असो, जातीची रचना असो, कौटुंबिक रचना असो वा अन्य कोणतीही रचना असो. या सगळ्या रचना ह्या प्रचंड विषमतावादी असून इतरांवर वर्चस्व मिळवण्यासाठी त्या रचनांची निर्मिती झालेली आहे. ह्या रचनांचे काही नियम आहेत. ते कठोर आहेत. त्यांना कधी कोणी छेद देण्याचा प्रयत्न केला तर त्याला इतर लोक वाळीत टाकतात. कधी कधी नैतिकता म्हणून ती सगळी नियम आपण पाळत असतो. आणि ह्या व्यवस्थानंचं - रचनेचे आपण मानसिक गुलाम आहोत हे आपल्याला गावीही नसतं ! अर्थात, आपल्याला गुलामीची जाणीवच नसते. तर कोणाला ह्या रचनेमध्येच आपण सुरक्षित आहोत, असं वाटतं.

बऱ्याचदा डार्विनच्या सर्व्हाईवल ऑफ फिटेस्ट या सिद्धांताचं देखील ह्या सामाजिक विषमतेचं समर्थन करण्यासाठी संदर्भ दिला जातो. सर्व्हाईवल ऑफ फिटेस्ट म्हणजे, जो ताकतवान आहे, तोच या सिस्टीममध्ये टिकू शकेल. हो, खरंय ते. पण माझा प्रश्न असा आहे की, जो ताकतवान आहे, तो या सिस्टीम मध्ये सर्व्हाईवल करेलच, पण शोषित घटकांचं काय ?  उपेक्षित घटकाला ह्या समाजाच्या रचना उसासारखं पिचून काढताहेत. ह्या एकाच कारणामुळं मला 'समाज' हा शब्द मान्य नाही आणि त्या समाजाच्या रचना आणि त्या रचनांचे नियम मला मान्य नाहीत.  समाजाचा भाग होण्यापेक्षा मला समूहाचा भाग व्हायला आवडेल. मला समूहाचे नियम मान्य असतील. दुसरं असं, समाजाच्या ज्या रचना आहेत, त्यात ओरबडण्याची वृत्ती आहे. आदिम काळात माणूस समूहाने राहायचा. तो जेव्हा समूहाने शिकार करायचा तेव्हा मिळवलेली शिकार ते वाटून खायचे !
मला आजच्या माणसापेक्षा आदिम मानवात माणूसपणाच्या खुणा जास्त होत्या, हे नमूद करावंसं वाटतं.
एक शेवटचं, शक्य झालं तर या रचनांची बंधन झुगारा. किंवा या रचनांना पर्यायी रचना निर्माण करा. ते करत असतांना मात्र, त्या रचनेत कुणाचा स्वार्थ दडला नसावा, ही अपेक्षा ! ज्या समाजातील रचना ह्या विषमतावादी, शोषणाला पूरक आहेत, तो समाज मी नाकारतो.
आणि हो, मला जगतांना मानवनिर्मित कुठल्याच रचनेची गरज देखील वाटत नाही ! काही रचना मी नाकारल्या आणि काही रचना हळूहळू  नाकारण्याचा प्रयत्न करतोय.. वाट काटेरी आहे, पण अवघड नाहीये ! येताय का सोबत, नव्या विषमताविरहित क्षितिजावर ?
-कबीर उषा लक्ष्मण बोबडे
ईमेल : kabirbobade09@gmail. com

Comments

  1. Manvjat hi shoshnachi adharshila aahe ...ani...manavjatushivay ya jgacha ulghada krnehi...ashakya aahe...sanskruti...hi ek pravahi vyavstha aahe jyat manvane. Veloveli bdl keli...ata he bdl yevdhe zale ki mul sankruti KY hoti hehi..smjne kthin..

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com