अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

हात्तिच्या, गांधी मरतच नाहीत !

आजपर्यंत इतिहासात अनेक क्रूर घटना घडल्या. त्याविषयी वाचलं, ऐकलं की, संवेदनशील लोक हळळतात. मात्र, त्या घटनांचं मूळ आपण शोधत नाही. विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की; ह्या ज्या क्रूर घटना घडल्या याच्या मुळाशी धर्म होता. स्वातंत्र्या नंतर देशातील पहिली क्रूर घटना कोणती असेल तर ती म्हणजे, राष्ट्रपित्याची हत्या. महात्मा गांधींनी जगाला सत्य, अहिंसेची शिकवण दिली, त्याच गांधीजींची हत्या झाली. धर्मरक्षक, देशभक्त म्हणून मिरवणाऱ्या हिंदुत्ववादी नथराम गोडसे याने गांधीजींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आता संघ परिवारातील लोकं नथुरामचं समर्थन करण्यासाठी सांगत असतात की, गांधी मुस्लिमधार्जिणे होते, त्यांनी फाळणी करून ५५ कोटी रुपये पाकिस्तानला दिले. म्हणून नथुरामने गांधीजींची हत्या केली. नथुराम खरे राष्ट्रभक्त होते. मात्र, माझ्यासारख्या सामान्य अक्कल असणाऱ्या माणसाला प्रश्न पडतो की, नथुराम देशभक्त होते तर त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले? कधी ब्रिटिश सरकार च्या विरोधात काही रोखठोक भूमिका घेतली का?असे अनेक प्रश्न आहेत मनात. आणि त्याची उत्तर ह्या तथाकथित धर्मरक्षकांकडे नाहीत, हे ठाऊक आहे मला. दुसरं असं, हत्येचं समर्थन करण्यासाठी फाळणी हे कारण असू शकत नाही, कारण नथुरामने यापूर्वी देखील अनेकदा गांधी हत्येचा प्रयत्न केला होता, तेव्हा तर फाळणीचा मुद्दा देखील नव्हता. महत्वाचं असं, गांधीवर जे हल्ले झाले ते सगळे हल्ले हे सनातन ब्राम्हण संघनेच्या कार्यकर्त्यांनी केले असून त्याचं कारण, धार्मिक अस्मिता टिकवणं हे होतं आणि गांधी तर अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात काम करत होते

काल गांधीजींची ७१ वी पुण्यतिथी होती. सगळं जग त्यांना आदरांजली वाहत असतांना मात्र, हिंदू राष्ट्रसभेच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पूजा पांडे यांनी गांधी गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून महासभेचे सदस्य आणि संर्थकांना मिठाई वाटली. हा 'हुतात्मा दिन' त्यांनी 'शौर्य दिन' म्हणून साजरा केला. मिठाई वाटण्याचे प्रकार यापूर्वी देखील झाले होते, मात्र; गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या मारण्याची मजल कुणी केली नव्हती.


आपल्या वाईज अँड अडरवाईज या पुस्तकातील एका लेखात सुधा मूर्ती आपल्या टिनएजर मुलाला विचारतात, 'या शतकातील (२० व्या शतक) तीन महत्वाचे शोध कोणते ते  सांग.' त्यावर मुलगा म्हणतो, 'अहिंसेचं तत्व, हिंसेमुळे घडून येणारा परिणाम आणि दळणवळणाच्या साधनांचा परिणाम.' मूर्ती यांच्या मुलाचं उत्तर विचार करायला लावणारं आहे. अहिंसेच्या तत्वाचा शोध गांधीजींनी लावला आणि तो विचार सर्वदूर पोहोचवला. अहिंसेच्या जोरावरच त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. अहिंसेच्या मार्गांनी लढे देण्याचा गांधीजींचा विचार मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, नेल्सन मंडेला, अलीकडच्या काळातील बराक ओबामा यांना प्रेरित करून गेला. जगाला अहिंसेचं तत्व देणाऱ्या गांधींजीची नथुरामने हत्या केली, मात्र गांधी अजून जिवंतच आहेत आणि त्यामुळेच पांडे यांनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. गांधीजीच्या हत्येचा नथुरामचा प्रयत्न फसला तर !

गांधीजींना जेव्हा तुम्ही संपवण्याची भाषा करता तेव्हा त्यांचं अस्तित्व तुम्ही नाही म्हटलं  मान्य करताच किंवा त्यांच्या विचाराना पुर्नज्जीवित करत असता.. तुमचे सगळे प्रयत्न असफल झालेत.. जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत गांधीजी असतील ! हात्तिच्या, गांधी मरतच नाहीत !!

-कबीर उषा लक्ष्मण बोबडे
kabirbobade09@gmail.com

Comments

Post a Comment

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com