वर्चस्वादी शब्द नाकारुयात
पूर्वी बायकांना केवळ चूल आणि मूल इतकंच काम होतं. बायकांची कामे या समाजाने ठरवून दिली. मात्र; सावित्री बाई फुले यांनी दगड धोंडे खात या स्त्रियांना शिकवलं. त्याचीच पुण्याई म्हणून आज अनेक स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. असं एकही क्षेत्र नाही की, जिथे स्त्री काम करत नाही. आज स्त्रिया उद्योग, चित्रपट या सारख्या क्षेत्रात काम करतात. असं असलं तरी एकविसाव्या शतकातही आपल्याला अनेक क्षेत्रात केवळ पुरुषांचीच मक्तेदारी दिसून येतेय.
चित्रपट हे एक क्षेत्र आहे, जिथे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात स्त्रिया काम करतांना दिसतात. काही दिग्दर्शिका म्हणून समोर येताहेत. तर काही मेकअप मॅन म्हणून काम करताहेत. काही कॅमेरामॅन म्हणून चांगलं चित्रीकरण करताहेत. मला खटकलेली गोष्ट अशी की, आज एखादी स्त्री कॅमेरा करत असेल तर आपण तिला सरळ 'कॅमेरामन' असं संबोधतो. ती मेकअप करत असेल तर आपण त्या स्त्रीला मेकअपमॅन म्हणून संबोधतो. तिला 'कॅमेरामॅन' 'मेकअप मॅन' या शब्दाऐवजी 'कॅमेरावूमन' - 'मेकअप वूमन' म्हटलं तर ते योग्य वाटेल. पुरुषी अभिमान बाळगून असलेल्या लोकांना असं वाटेल की, हे स्त्री प्रधान सत्तेचं उदात्तीकरण करताहेत परंतु; आपण जेव्हा शब्दांच्या शेवटी 'मॅन' वापरतो, तेव्हा काय करतो, हा विचार केला पाहिजे. कित्ती पुरुषी अभिमान आहे आपल्याला आपल्या कर्तृत्वाचा. पुरुषी अभिमानी (पुरुष वर्चस्ववादी) किंवा स्त्री अभिमानी (स्त्री वर्चस्ववादी) शब्दांऐवजी अधिक सयुक्तिक संबोधन कुठलं असेल तर ते 'कॅमेरापर्सन' 'मेकअप पर्सन' आहे. कारण; 'कॅमेरापर्सन' किंवा 'मेकअप पर्सन' हे संबोधन आपण स्त्री - पुरुष अशा दोघांसाठी वापरू शकतो. आपण जे आतापर्यंत पुरुषीभिमानी शब्द वापरत आलो, ते सगळे शब्द पुरुषसत्ताक व्यवस्थेतून आलेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेतून आलेले हे शब्द आपण नाकारले पाहिजेत.
लक्षात घ्या, भाषेची निर्मिती ही माणसाने केली. भाषा कृत्रिम आहे. आपल्या समाजात पूर्वी पुरुषसत्ताक व्यवस्था होती, आणि मग भाषेची निर्मिती करतांना पुरुषांना वाटलं असेल की, काही कामे बायका कधी करणार नाहीत, त्यामुळे ती कामे पुरुषांच्या मक्तेदारीची झाली. आणि मग ते काम करणाऱ्या माणसाला 'मॅन' हे बिरुद किंवा प्रत्यय लावला जाई. जसं की, कॅमेरा'मॅन'. मात्र, 'अमुक' काम केवळ पुरुष'च' करु शकतो, हा पुरुषांचा विश्वास खोटा ठरला. आणि आज तरी देखील 'ते विशिष्ट काम' करणाऱ्या स्त्रीला मॅन हे प्रत्यय लावल्या जातं. -जसं कॅमेरामन. या शब्दांसारखे अनेक शब्द आहेत. पोलीसमॅन, पोस्टमन, स्पोर्टमन, चेअरमन वैगरे... एकेकाळी पुरुषांचं वर्चस्व असलेली ही क्षेत्र होती. स्त्रियांनी या पदांवर काम करण्यासाठी किंवा ही कामे करण्यासाठी लागणारी योग्यता मिळवली.
पुरुषसत्ताक ही सामाजिक आणि वैचारिक व्यवस्था असून यामध्ये स्त्रीला दुय्यम समजले जाते. हे वर्चस्ववादी सगळे शब्द या व्यवस्थेचीच रचित आहेत. वर्चस्ववादी शब्द बोलण्यातून - लिहिण्यातून हद्दपार करू आणि माय सावित्री बाईंन शिकवलेली समानतेची बाराखडी रुजवू !
-कबीर उषा लक्ष्मण बोबडे
ईमेल - kabirbobade09@gmail.com

Comments
Post a Comment