अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

संधिकाळ ओळखा

पूर्वीची राज्यव्यवस्था ही राजेशाही पद्धतीची होती आणि आताची राज्यव्यवस्था ही लोकशाही प्रणालीची आहे. राजेशाही आणि लोकशाही व्यवस्थेतला मुख्य फरक म्हणजे, राजशाही व्यवस्थेत राजपद हे वंशपरंपरेने/ वारसा हक्काने त्याच्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होते. राजा म्हणेल ती पूर्व दिशा. तेथे जनतेचा कौल विचारात घेण्यात येत नसे. त्या व्यवस्थेत जनतेला दुय्यम स्थान असे. याच्या अगदी उलट लोकशाही प्रणालीत होतं. म्हणजे,  वयाची १८ वर्ष पूर्ण करून असलेली कोणताही नागरिक राज्य संस्थांमध्ये जनतेचं प्रतिनिधित्व करू शकतो. लोकशाहीची व्याख्याच अशी आहे की, लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेले राज्य. त्यामुळे लोकशाहीत जे कोणी सत्तारूढ होतात, त्याला जनतेचा पाठिंबा असतो. लोक त्याला निवडून देतात. लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रियेत जनतेचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येतो.

घटनेनं आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. मात्र; बहुतांश नागरिक तो अधिकार नीट बजावतांना दिसत नाहीत. मतदानाचा दिवस ते सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतात. लोकांच्या या मानसिकतेमुळे 'लायक नसलेले गाढव' सत्तारूढ होतात आणि मग ते गाढव पाच वर्षे जनतेला फक्त आणि फक्त लाथाडत असते. मग आपण सत्तेतील लोकांच्या नावाने बोंबलत बसतो. डेव्हिड रन्सीमन हा विचारवंत म्हणतो,  Much of the time politics matters very little to Most people. Then, suddenly, it matters All Too Much! मग बोंबलून काही होतं नसतं ! उरतं ते फक्त पाच वर्षे सरकारला सहन करणं.


दुसरं असं, निम्म्याहून अधिक जनतेला स्वतःचा असा पोलिटिकल व्हू नाही किंवा त्यांना निवडणूका - मतदान ह्या गोष्टींशी काही देणंघेणंच नसतं, ही भूमिका प्रचंड आत्मघातकीपणाची असते. खरं पाहिलं तर हेच लोक 'चुकीचं' सरकार सत्तेत येण्यास कारणीभूत असतात.

निवडणूका जवळ आल्या की, प्रचारकाळात उमेदवार जनतेला 'अच्छे दिनाचं' गाजर दाखवतो. खोटी आणि भंपक आश्वासने जनतेला दिली जातात, जे कधी पूर्ण करता येण्यासारखं नसतं. मात्र, ते जनतेच्या लक्षात येत नाही आणि आपण देखील ह्या भूलथापांना बळी पडतो. इतक्यानं भागतच नसेल तर - खोट्या अस्मिता, अमुक तमुक राष्ट्वाद या लोकांच्या भावनिक मुद्द्याला हात घातल्या जातो. मग मूर्ख जनता आंधळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवते. आणि पुन्हा पाच वर्षे लाथा खात बसते. लक्षात घ्या, भावनिक मुद्दे हे आपले खरेखुरे प्रश्नच नाहीत.  युवाल नो हरारी हा लेखक त्यांच्या पुस्तकामुळे सगळ्या जगात प्रचंड गाजतोय, तो म्हणतो - Election are always about feelings, not about human reality. The reliance on the heart might prove to be the weakness of liberal. खरंच आहे ते - भावनिक मुद्द्यावर होणाऱ्या निवडणूका जनतेला महागात पडत असतात. आपण गेल्या पाच वर्षापासून तेच अनुभवतोय.

मतदारांनो, हे टाळायचं असेल तर योग्य उमेदवाराला मत द्या. त्याचं शिक्षण - विकास कामं करण्याची आवड आहे की, नाही -जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची आवड आहे की नाही,  त्याची आयडिओलॉजी - जनतचा कौलाने कामे करतो का, हे सगळं तपासा आणि मगच मतदान करा. निवडूका ह्या आपल्यासाठी संधिकाल असतात. सत्तेचा माज असलेल्या सत्ताधीशांना सिंहासनावरून खाली खेचता येतं, ही संधी गमावू नका. संधिकाळ ओळखा आणि भोवतालचा अंधार दूर करा !

-कबीर उषा लक्ष्मण बोबडे
ईमेल - kabirbobade09@gmail. com

Comments

Post a Comment

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com