अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

मन:पूर्वक खुशवंत



विसाव्या शतकातील राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ख्यातनाम पत्रकार खुशवंत सिंग हे माझ्या आवडीचे पत्रकार. अनेकांना ते सडेतोड लेखन करणारे स्तंभलेखक म्हणून परिचित आहेत. 'योजना' आणि 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया' या नियतलिकांचे ते संपादक होते. त्यांनी 'नॅशनल हेरॉल्ड' आणि 'हिंदुस्थान टाइम्स' या दैनिकात संपादक पदे भूषवली. याशिवाय त्यांनी IFS अधिकारी, वकील, लेखक,  खासदार (राज्यसभा)  म्हणून देखील काम केलं. त्यांची train to pakistan ही कादंबरी वाचली. त्या कादंबरीवरील सिनेमा देखील पाहिला. 'We indians',  'the sunset club', 'agnostic khushwant', 'the good, the bad rediculous', 'women and men in my life' त्यांची ही पुस्तके वाचली. अजूनही त्यांची काही पुस्तके मिळवून वाचतोय. माझ्या माहितीनुसार, आणिबाणिचं समर्थन करणारे ते पहिले पत्रकार. त्यांना १९७४ ला पद्म भूषण पुरस्कार देखील मिळाला होता. मात्र, त्यांनी ब्लु स्टार ऑपरेशन चा निषेध म्हणून तो पुरस्कार परत केला. नंतर २००७ ला त्यांनी पद्म बिभूषण पुरस्काराने सन्मानित केल्या गेलं.  सध्याच त्यांच्यावरचं 'मनःपूर्वक खुशवंत सिंग' हे त्यांनी आणि  हुम्रा कुरेशी यांनी लिहिलेल्या  पुस्तकाचा अभिजित थिटे यांनी केलेला अनुवाद वाचला.  या पुस्तकात त्यांनी त्यांचं खाजगी आयुष्य, विवाह, प्रेम, सेक्स आणि एकूणच त्यांच्या लेखन- संपादनाविषयी मनमोकळेपणे लिहिलं.


'माझ्या चिंतेचं कारण : असहिष्णुता' लेखाची सुरुवात ते अशी करतात-  'हल्ली मला टोकाचा विचार करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या गटाची चिंता वाटते.... त्यांच्या हातात देश देण्याचा धोका आपल्या लक्षात येत नाही'  बाबरी मशीद पाळणं, गुजरात मधील अमानुष हत्याकांड या घटनांनी खुशवंत सिंगाचं मन अस्वस्थ होतं. जातीयवाद हा देखील असाच एक लेख.  या लेखात शेवटी खुशवंतसिंग लिहितात-  हा जातीयवाद, चुकीच्या समजुती आणि त्याला धरून होणारे वर्तन ही या देशासाठी चिंतेची बाब आहे, असं सांगत आपण सर्वांनी एकत्र येऊन देश वाचवायला हवा, देश विघातक कारवाया करणाऱ्यांना विरोध करायला हवा, जातीयवादा विरोधात लढून आपलं देशप्रेम सिद्ध करायला हवं, असं लिहिलं. नवी पिढी जातीयवाद नाकारले असं त्यांना आशावाद होता. मात्र, आज तसं होतांना दिसत नाही.

खरं तर आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणतीतरी श्रद्धास्थान असतात, अगदी तशीच श्रद्धास्थान खुशवंत सिंग यांच्या आयुष्यात देखील आहेत.  ती श्रद्धास्थान म्हणजे - महात्मा गांधी आणि मदर तेरेसा.  या दोघांविषयी देखील त्यांनी 'माझे श्रद्धास्थान' या लेखात सविस्तर लिहिलं. याच लेखात त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयीची एक आठवण सांगितली. १९९९ मध्ये दिल्ली मतदारसंघातून मनमोहन सिंग निवडणूक लढवत होते. त्यावेळी निवडणुकीच्यावेळी प्रचारासाठी त्यांना काही टॅक्सी भाड्याने घ्यायच्या होत्या. त्यासाठी त्यांना दोन लाख रुपयांची गरज होती. त्यासाठी मनमोहन सिंगांचा जावई खुशवंत सिंग यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला. मनमोहन सिंगांचा जावई पैसे मागायला आल्यावर खुशवंत सिंगांना धक्का बसला. मनमोहन सिंग निवडणूक हरले. एकदिवस मनमोहन सिंग खुशवंत यांना भेटायला गेले आणि त्यांनी 'ते' पैसे परत केले.  या घटनेविषयी खुशवंत सिंगांनी लिहिलं की, 'कोणताही राजकारणी असं कधी करत नाही. कोणी नैतिकतेबद्दल बोलायला लागलं की, मी सांगतो,  नैतिकतेचं उत्तम उदाहरण म्हणजे, आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती (मनमोहन सिंग).

'जातीयवाद', 'माझी खंत', 'दहशतवाद', 'आपलं राजकारण' या लेखांमधून खुशवंतसिंग यांनी सडेतोडपणे लेखन केलं. त्यांचे हे लेख आपल्याला आत्मभान देणारे, चिंतन करायला लावणारे आहेत.

'माझी खंत' या लेखात खुशवंत सिंग म्हणतात- 'मी लिहायला खुप उशीरा सुरुवात केली, याची मला खंत आहे... धार्मिक आणि रूढीवादी मूलतत्त्वे यांच्या विरुद्धच्या लढ्यात मोठे योगदान द्यायला हवं होतं.' याच लेखात त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी देखील  रोखठोकपणे लिहिलं. अडवाणींची त्यांच्या मनात एक प्रामाणिक आणि सच्चा माणूस अशी प्रतिमा होती. मात्र ज्या दिवशी त्यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली,  त्या दिवसांपासून यांची प्रतिमा खुशवंत सिंगांच्या मनातून पुसल्या गेली.

'जवाहरलाल नेहरू' या लेखात खुशवंत सिंग यांनी नेहरूंची दूरदृष्टी, त्यांची धोरणे- योजना या सगळ्या गोष्टीचं कौतुक केलं. तर नेहरूंच्या विक्षिप्त वागण्याचे देखील काही उदाहरणं दिलीत.

संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीचे समर्थन केल्याचा आरोप खुशवंत सिंग यांच्यावर होतो. मात्र त्यांनी ते समर्थन केल्याचं, कधी नाकारलं देखील नाही. याविषयी त्यांनी लिहिलं की, 'मला वाटतं त्यावेळी 'ते' गरजेचं होतं. पुढे त्याचा गैरवापर होईल अशी त्यावेळी मला शंका वाटली नव्हती.' पुढे सिंग लिहितात, 'संजय गांधी मध्ये हुकूमशाहचे गुण आहेत असं बोलल्या जायचं.  मात्र त्यांचा दृष्टिकोन चांगला होता. फक्त त्यांना बदलाची खुपच घाई झाली होती.... संजय गांधी जगले असते तर लोकशाही टिकली नसती.' यांचं लेखात त्यांनी वरून गांधी विषयीची मतं देखील व्यक्त केली. वरून गांधींच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला सिंग उपस्थित होते. वरूण गांधींच्या कविता संग्रहावर त्यांनी लिहिलं देखील होतं, मात्र, वरूणची मुस्लिम लोकांविषयी द्वेष पसरवणारी विधान ऐकली तेव्हा खुशवंत सिंगांना वाईट वाटलं.

राजीव गांधी यांचा खरंतर  राजकारण हा पिंड नव्हता.  केवळ इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांना जनाधार मिळाला होता, आणि ते  राजकारणात आले. त्यावेळेस दिल्लीत शिखांना जाळण्यात येत होतं. कारण, इंदिरा गांधींनी हत्या शिखांनी केली होती. राजीव गांधी दिल्लीत होणाऱ्या शिखांच्या हत्या थांबवू शकले असते. मात्र; ते न थांबवता, उलट त्यांनी त्याचे समर्थनच केले. नेहरू असते तर त्यांनी ह्या शिखांना जळू दिलं नसतं. पोक्त राजकारणी आणि शिकाऊ राजकारणी यातला फरक सिंगांनी अधोरेखित केला. राजीव गांधींचं चुकलं, असं त्यांना वाटे. तर याच लेखात त्यांनी राहुल गांधींचा विचार, दूरदृष्टी या बाबींचं कौतुक केलं. राहूल गांधी जातिभेद मानत नाहीत. अमेठीतील खालच्या समजल्या जाणाऱ्या लोकांसोबत ते जेवतात, शिवसेनेने मुंबईत अमराठी लोकांवर केलेल्या हल्ल्याची राहुल गांधी निंदा केली. राहुल गांधी मधील हे पोक्तपणाचे गुण खुशवंत सिंगांना आवडले.

'मृत्यू' सहजतेने यावा अशी त्यांची इच्छा होती आणि ती त्यांनी मृत्यू या लेखात व्यक्तपण केली. त्यांच्या या लेखातील एक कविता मला आवडली-
सूर्यास्त आणि चांदणी
मला स्पष्ट हाक ऐकू आली तेव्हा रडू नका,
जेव्हा मी समुद्राकडे जाईल.
असंच असतं
संधिप्रकाश, संध्याकाळी आणि रात्र
मी जाईन तेव्हाही नको
खिन्नत्व, दुःख आणि उदासवाणा निरोप...

'फाळणी', '१९८४ दंगल' या लेखातून खुशवंत सिंह यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील उलथापालथी - घटना यांची नोंद घेतली. तर, 'उर्दू', 'भविष्य, नशीब आणि विश्वास', 'मृत्यू' 'धर्म' या लेखातून चिंतनात्मक मांडणी केली. या पुस्तकात त्यांनी नेहरू, इंदिरा गांधी, लालकृष्ण अडवाणी, राजीव गांधी, संजय गांधी, वरूण गांधी या सगळ्या लोकांविषयी कुठलीही भीडभाड न ठेवता लिहिलं. तर, 'थोडसं कामाबद्दल', 'पहिलं प्रेम', 'प्रेम आणि विवाह', 'कवल आणि मी' या लेखातून त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्य विषयी खुलेपणाने - कुठलाही आडपडता न ठेवता लिहिलं. हे पुस्तक म्हणजे खुशवंत सिंह यांचं वैयक्तिक आयुष्य आणि भारताच्या इतिहासातील अस्वस्थ करणाऱ्या घटनांचं दस्ताऐवज म्हणायला हरकत नाही.  भारताच्या इतिहासातील झालेल्या उलथापालथी - घटना यांचा अभ्यास करायचा असेल तर खुशवंत सिंगांचं  साहित्य आवर्जून वाचलं पाहिजे.

पुस्तकाचे नाव - मन:पूर्वक खुशवंत
लेखक - खुशवंत सिंग । हुम्रा कुरेशी
अनुवाद - अभिजित थिटे
प्रकाशन - रोहन प्रकाशन, पुणे
पाने - १२८
मूल्य - १२५ रुपये

-कबीर उषा लक्ष्मण बोबडे
ईमेल - kabirbobade09@gmail.com

Comments

  1. कबीर जी लिहीत रहा ,, खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com