अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

मुलाखत-

'स्त्रीसत्ताक वा पुरुषसत्ताक व्यवस्थेऐवजी स्त्री-पुरुष समानता पाहिजे !'

कबीर उषा लक्ष्मण बोबडे

(आज दि. १९ नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या त्यानिमित्ताने पुरुषांच्या हक्कासाठी काम करणारे पुरुष हक्क संरक्षण समितीचे  अ‍ॅड. शिवाजी कराळे यांच्याशी साधलेला संवाद)


आज भारतात पुरुषसत्ताक व्यवस्था आहे, पुरुष ठरवतील ती दिशा असते आणि स्त्रिया या पुरुषसत्तेच्या बळी ठरतात, असे असतांना देखील तुम्हाला पुरुष हक्क संरक्षण समितीचे काम का करावेसे वाटते?
- खरंतर पुरुषांची संघटना चालवण्याचा उद्देश हा आहे की, महिलांच्या बाजूने असणारे जे कायदे आहेत, जसं की, डोमेस्टिक व्हायलान्स, 498, पोटगीचा कायदा, सिव्हिल मेंटेनन्स, आडोप्शन कायदा... त्या कायद्यांचा महिला सर्रास दुरुपयोग वापर करत आहेत. यात पुरुष होरपळल्या जातो. शिवाय त्या पुरूषाच्या घरातील इतर महिला देखील होरपळतात. 498 सारख्या केसेस मध्ये केवळ पुरुषावर केस केल्या जात नाही, त्यात त्याची बहीण, आई, भावजय या स्त्रियांवर देखील केस दाखल केल्या जाते. साधारणतः 35 टक्के पुरुष चुकीचे वागत असतील, मात्र 65 टक्के स्त्रिया कायद्याचा गैरवापर घेतात. पुरुषाने गुन्हा खरोखर केला असेल तर जरूर त्याच्यावर केस दाखल करा, पण केवळ पुरुषाचा छळ करण्यासाठी या कायद्यांचा वापर होत असेल तर पुरुषावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी पुरुष हक्क समिती स्थापन केली.



स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराचे स्वरूप हे कौटूंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार असं असते. तर पुरुषांवर होणार्‍या अत्याचाराचे स्वरूप नेमकं कसे असते ?
- समजा स्त्रीचं  लग्न झालं तर ती महिला लगेच नवऱ्याला वेगळं व्हायला सांगते. कारण, तिला सासू - सासरे नको असतात. सासू सासर्‍यांना ती कचराकुंडी समजते. आणि वेगळं राहायला तिला यश आलं नसेल तर ती वेगवेगळे स्वरूपाचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करते.  मग पोलीस त्या लोकांना आरोपी म्हणून वागणूक देतात. विनाकारण त्या पुरुषांसह त्याच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना कोर्टात चकरा माराव्या लागतात, यात पुरुषाचा मानसिक छळ, शारीरिक, आर्थिक छळ होतो. हा अत्याचारच आहे.

वर्तमानपत्रात सातत्याने महिला अत्याचाराच्या बातम्या वाचायला मिळतात. मात्र, पुरुष अत्याचाराच्या बातम्या येत नाहीत..
- माध्यम सध्या कॉन्ट्रॅव्हर्सि झालीत. समाजाला आणि माध्यमाला असं वाटतं की, अत्याचार फक्त स्त्रीवर होतो. त्यामुळे आम्ही जेव्हा समाजात काम करतो, तेव्हा लोक हसतात आम्हाला.. का, तर, आम्ही पुरुषांची संघटना चालवतो. खरंतर पुरुषावर देखील अन्याय होतो, हे माध्यमांनी समजून घ्यायला हवं. माध्यमे महिला दिनाच्या दिवशी मथळेच्या मथळे लिहितात. स्त्रियांच्या अन्याय बद्दल लिहितात.. कर्तृत्वबद्दल लिहितात.. मग पुरुष दिनाच्या दिवशी माध्यमे का काहीच लिहीत नाहीत.. पुरुषांवर अत्याचार होत नाहीत का ? पुरुष कर्तृत्ववान नाहीत ? आहेत ना, मग लिहिलं पाहिजे त्यांच्यावर देखील.

आज अनेक महिला संघटना आहेत. एक उद्दिष्ट घेऊन काम करतात. स्त्रीभान - स्वाभिमान  जागे करण्याचा या संघटनांचा प्रयत्न असतो.  पुरुष संघटनेचे उद्दिष्ट काय आहे ?
-पुरुषांवर होणारा अन्याय हाणून पाडणे, हाच संघटनेचा उद्देश आहे. कोर्टात स्त्रियांकडून पुरुषांच्या विरोधात अनेक केसेस येतात. पण, त्यातील बऱ्याच केसेस डिसमिस होतात, तर का... तर त्याकेसेस मध्ये पुरुषाने गुन्हा केलेलाच नसतो. 

बरेच कायदे महिलांच्या बाजूने झुकणारे आहेत. पुरुषांसाठी काही कायदे आहेत का ? किंवा पुरुष वर्गासाठी काही कायदे असावेत असं तुम्हाला वाटतं ?
-कायद्याच्या बाबतीत सर्व समान आहेत. 302 सारखा खुनाचा गुन्हा पुरुषाने केला काय, किंवा स्त्रीनेे केला काय त्याला शिक्षा सारखीच आहे. पण स्त्रियांसाठी काही वेगळे कायदे आहेत, असं का ? म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की, जसा महिला आयोग आहेत, तसा पुरुष आयोग देखील असावा. बर्‍याचदा बाजारातील काही स्त्रिया पुरुषाला हातवारे करतात, तेव्हा पुरुषांचा विनयभंग नाही का होत ? मग त्यावेळेस पुरुषांच्या बाबतीत का कुणी उभं राहत नाही. बर्‍याचदा पुरुष जेव्हा महिले विरुद्ध तक्रार करायला पोलीस स्टेशनला जातो, त्यावेळेस पुरुषाची तक्रार पोलीस दाखल करून घेत नाहीत. पण, पुरुषा ऐवजी स्त्रीने तक्रार दाखल केली तर लगेच तक्रार दाखल करून त्याला तंबी दिल्या जाते. पुरुष चुकत नाहीत असं नाही,  पुरुष चुकतात. पण महिला चुकतच नाहीत, असं तुमचं मत असेल तर ते चुकीचं आहे.

तुम्ही म्हणाला, महिला आयोगा सारखा पुरुषांसाठी पुरुष आयोग असावा..  मग, महिलासाठी महिला मंत्रालय आहेत, तसं पुरुषांसाठी पुरुष मंत्रालय असावं का ?
-पुरुष आयोग नक्कीच असायला हवा. कारण, पुरुषांच्या तक्रारीची कुणी दखलच घेत नाही. मग त्याने तक्रारी कुणापुढे मांडाव्या ? दिलासा सेल मध्ये काय होत, नेतोस नांदायला ? की, 498 दाखल करू? तिथे असं का होत नाही, की बाई चूक तुझी आहे, नवरा बरोबर आहे. पण ह्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत. मग पुरुष आयोग असेल तर त्याची बाजू तरी पुरुष आयोग ऐकून घेईल. म्हणून पुरुष मंत्रालय राहू देत बाजूला, पण किमान पुरुष आयोग तरी असावा..!

पुरुष महिला अत्याचार करतांना घाबरतो, त्याला महिला चळवळीची भीती वाटते. तसे स्त्रीने पुरुषावर खोटा गुन्हा दाखल करु नये यासाठी किंवा पुरुषांच्या बाजूने देखील सरकारने विचार करावा, यासाठी महिला वर्गापुढे - सरकार पुढे दबावगट निर्माण करणे, हा पुरुष हक्क संरक्षण समितीचा उद्देश आहे का ?
-हो, निश्चितच. दबावगट निर्माण करणे, हा एक उद्देश आहेच शिवाय, पुरुष हक्कासंदर्भात जागृती करणे हा देखील उद्देश आहेच. आज स्त्रीला नवर्‍याकडून पोटगी दिल्या जाते. पण, बायको कमावणारी असेल तर पुरुषाला देखील स्त्रीकडून पोटगी मिळू शकते.. पण, हे किती पुरुषांना माहीत आहे ? नाही माहित. म्हणून आम्ही पुरुष हक्क संरक्षण समितीचे काम करतो.

आज महिला चळवळीत असंख्य पुरुष काम करतात, तुमच्या पुरुष हक्क समितीचे संघटनेमध्ये महिला आहेत का ?
- हो, खूप स्त्रीया संघटनेशी जुळलेल्या आहेत. त्यात अपर्णाताई रामतीर्थकर आहेत. आमच्या संघटनेत पुरुषांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या स्त्रियांची संख्या जवळपास 400 ते 500 आहे.

मीटू बद्दल काय वाटतं ?
- मीटू बद्दल सांगायचं तर, घडलेल्या - न घडलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्याला अनेक वर्षे झालीत आणि तुम्ही गुन्हा आज दाखल करता, याला अर्थ नाही. नाना पाटेकर, आलोकनाथ यांच्यावर कित्येक वर्षांनंतर आरोप केल्या गेले. तेव्हाच का केले नाही ?

पण, महिला आता कुठं बोलावला लागल्यात. बोलू देत ना महिलांना
- महिला आज बोलत नाही, महिला आधीपासून बोलतात. मीटूमुळे अनेक संसार उद्धवस्त झाले. उद्या पुरुषाने जर खोट्या तक्रारी दाखल केल्या, किंवा अमुक - तमुक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, याची जाहिर वाच्यता किंवा खोटी तक्रार दाखल केली तर स्त्रियांचे संसार उधस्वत होतील. मीटू ही केवळ प्रसिध्दी मिळवण्यसाठी केलेली स्टंटबाजी आहे.

पुरुष स्वतःवर होणारा अन्याय - अत्याचार कबूल करत नाहीत. यासंर्भात पुरुष वर्गाला काय सांगाल ?
- पुरुष वर्गाने अन्याय होत असेल तर जरूर पुढे येऊन तक्रार दाखल करायला पाहिजे. पुरुष हा विचार करतो की, तक्रार दाखल केली तर आपली चव जाईल.. त्यामुळे तो व्यक्त होत नाही. पण, त्याने व्यक्त व्हावं !

भारतात पूर्वी मातृसत्ताक व्यवस्था होती, आज पुरुषसत्ताक व्यवस्था आहे. तुम्ही पुरुषसत्ताक व्यवस्थेचे समर्थन करता की, स्रीसत्ता ?
-मी जरी पुरुष हक्कासाठी लढत असलो तरी मी काही पुरुषसत्तेचे समर्थन करत नाही, ना स्त्रीसत्ताक व्यवस्थेचे समर्थन करतो. मी फक्त स्त्री - पुरुष समानतेचे समर्थन करतो.

Comments

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com