अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

#नाट्य परीक्षण-

*'अरे देवा'... देव हरवला...!*

*कबीर बोबडे*

राज्य संचलनालय आयोजित 59 व्या हौशी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत शनिवारी नटेश्‍वर कला व क्रीडा मंडळाने नगर केंद्रावर महेश केळुसकर लिखित आणि राजेंद्र क्षीरसागर दिग्दर्शित अरे देवा हे दोन अंकी नाटक सादर केले. कलाकारांचा उत्तम अभिनय,  तंत्रज्ञांनी दिलेली अचूक साथ आणि दिग्दर्शकाचे भन्नाट कौशल्य यामुळे नाटक एका वेगळ्या उंचीवर पोहोचले.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन टोकाच्या दोन गोष्टी... दोन ध्रुव... दोन टोकं... मात्र, या दोन गोष्टीतील सीमारेषा अत्यंत पुसट, धूसर असते. श्रद्धावान वा आस्तिक माणूस कधी नकळत श्रद्धेचा नावाखाली अंधश्रद्धेलाच जवळ करून बसतो. जीवनाचे सत्य नेमके काय आहे, याचा शोध घेण्यात त्याचा बराचसा वेळ खर्ची होतो. एकवेळ अशी येते की ही लढाईच नको असे त्याला वाटते; परंतु तेव्हाच एखादा आशेचा किरणही त्याला दिसतो. ते नाटक म्हणजे 'अरे देवा !'


मानवी जीवनात असंख्य मायामोह असतात आणि या मोहमायावर ज्याला विजय मिळवता आला तो जिंकला, अशा आशयाचे हे नाटक होते. अरे देवा या नाटकात 'देव' नावाचे अदृश्‍य पात्र आहे ते स्वतंत्र नगर पोलिस ठाण्यात तक्रार देते, की आपण हरवलो असून शोधून देणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. मग इन्सपेक्‍टर पवार, हवालदार सुर्वे आणि एक कीर्तनकार बापूराव लुकतुके हे सारेच पैशांच्या लालसेपायी देवाला शोधण्याच्या मागे लागतात आणि एकमेकांचे वैरी होतात त्यातून एकमेकांना संपवतात, अशी या नाटकाची कथा होती.

लुकतुके हे त्यांच्या घरातील मोलरीन असलेल्या 15 वर्षाच्या शेवंता पांडू जाधव हिच्यावर बलात्कार करतात, आणि अगदी आता म्हातारपणी शेवंताने स्वतःला जाळून घेतलेलं असतं. ही म्हणजे, शेवंता इन्स्पेक्‍टर पवार यांची मावशी असते. शेवंताचं बलात्काराचं प्रकरण मिटवून टाकण्यासाठी लुकतुके यांनी इंस्पेक्‍टर पवारला 50 हजार रुपये दिलेले असतात. पैशासाठी लोक अन्यायाचे तोंड दाबतात.. हा सगळा प्रकार लुकतुके यांनी दुगाताई लुकतुके (पत्नी) यांच्यापासून लपवलेला असतो. शिवाय, दुर्गाबाई आणि लुकतुके यांना मुलबाळ का नाही, याचाही खुलासा देव करतो. आणि दुर्गाबाई समोर लुकतुके यांच्याकडून सत्य वदवून घेतो. लुकतुके यांनी स्वतः नसबंदी करन घेतलेली असते, आणि वांझपणाचा शिक्का बसतो तो दुर्गाबाईवर. जेव्हा हे सगळं दुर्गाबाईला इसमाकडून (देवाकडून) कळते तेव्हा दुर्गाताई घर सोडून निघून जातात. लुकतुके देवाला विनंती करतात की, दुर्गाबाईला समजावून सांगा. लुकतुके दुर्गाबाईंची विनवणी करतात... मात्र, दुर्गाबाई ह्या लुकतुके यांचे काहीही न ऐकता, मागचा पुढचा काहीही विचार न करता घर सोडतात. दुर्गाबाईंच घर सोडून जाणं म्हणजे, लूकतुके यांच्यापासून मिळवलेली मुक्‍तीच जणू.

एक कोटी रूपये बक्षीस मिळावं म्हणून देवाच्या शोधत इंस्पेक्‍टर पवार आणि सुर्वे देखील असतात. अशाच एका रात्री पोलीस स्टेशनमध्ये इंस्पेक्‍टर पवार यांच्याकडून सुर्वे वर गोळी झाडल्या जाते. सुर्वे मरतो. तेवढ्यात लुकतुके तिथे येतात. पवार प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी लुकतुके यांची मदत घेतात. मदत केली नाही तर तुझं बलात्काराचं प्रकरणाची फाईल ओपन करेल, असं दम भरतात. लुकतुके प्रेत आडात टाकण्यासाठी मदत करतात. आणि इथून सुरू होतो, माणसाच्या स्वभावाचा नाट्यमय प्रवास ! माणसं कशी खोटी, फसवी, ढोंगी, मुखवटा घेऊन जगणारी असतात, याचा प्रत्यय हे नाटक बघतांना येतो. वरपांगी देव- देव करणारी, साधी - भोळी वाटणारी लोक प्रत्यक्षात मात्र, किती क्रूर असतात, हे लुकतुके या पात्रावरून लक्षात येते. अब्रू प्यारी असणारी अब्रू जपण्यासाठी माणसांचे गळे कापायला देखील कमी करत नाहीत ! खोटे खोटे मुखवटे घालून माणसं वावरत असतात.. मात्र, हे मुखवटे कांद्याचे पापुद्रे सोलतो तसे सोलत गेलो की, समोर येतो विद्रुप चेहरा !

अरे देवा हे नाटक म्हणजे, श्रद्धा, माणसं यांचा खेळ आहे. देवाचा शोध घेणारी माणसं माणसांना कसं संपवतात, यांचे दर्शन या नाटकात होतं. हा या नाटकातला विरोधाभास प्रेक्षकांना विचार करायला लावतो. वरपांगी साधी सरळ वाटणारी माणसं किती आड वाटेची असतात, किती बेमालूमपणे खोट आयुष्य जगतात, इतरांना फसवतात... आणि म्हणून देव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतो, मी हरवलोय, मला शोधा. सुंदर काळजात देवाचा निवास असतो, असं म्हणतात.. मात्र, देव आपल्यातून, आपल्या मनातून कधीच हरवलाय.. किंबहुना आपण हद्दपारच केलाय ! प्रत्येकाने तो देव शोधावा, तो दव- ज्याला असत्य आवडत नाही, फसवेगिरी आवडत नाही. त्वेषाने लुकतुके खरे बोलतो, तेव्हा त्याच्याकडून मार खाणारा देव शोधावा... लुकतुके बाई जेव्हा देवाला म्हणतात, तुम्ही किती घाण बोलता, तेव्हा देव उत्तरतो - 'सत्य घाण नसतं, सत्य सुंदरही नसतं... सत्य निराकार असतं.' तो देव शोधावा. हे नाटक माणसाला विचार करायला लावतेच.. शिवाय, माणूस स्वतःचाही शोध घेतो.. जेव्हा आपण देवाचा शोध घेऊ, तेव्हा आपणच देव झालेलो असू. नैतिकता शिकवणार नाटक हे मूल्य चिंतनात्मक नाटक आहे.

हे नाटक समकालीन वास्तवाशी साम्य सांगते. बऱ्याच सद्य स्थितील संदर्भ नाटकात येतात, शिवाय, माणसांचे चित्र - विचित्र स्वभावाचे दर्शन नाटकात होते, त्यामुळे प्रेषक खिळून राहतो.

नाटकातील महत्वाचं भागा असतो तो संवाद. या नाटकातील बोली भाषा ही कोकणी असून प्रत्यक्षात नाटक मुंबईतील वातावरणात घडते. संहितेतील संवाद आणि टायमिंग यांच्यामुळे विनोद उंची गाठतो. विलास कुलकर्णी यांनी साकारलेली देवाच्या भूमिकेला त्यांनी उत्तम न्याय दिला. प्रेक्षकांना नाटकाशी जोडून ठेवण्याचे श्रेय विलास कुलकर्णी यांना जातं. सहज हावभाव, उत्तम संवादफेक त्यामुळे लुकतुकेची भूमिका साकारणारे राजेंद्र क्षीरसागर यांनी ती भूमिका जगली आहे, असं वाटतं. यातील प्रत्येक पात्र, अभिनय करत नव्हतंच, तर भूमिका साकारणारे पात्र, त्या भूमिका जगत होते, त्यामुळे अभिनयाचा अवास्तव आविर्भाव टाळून नाटक खरंखुरं घडतंय असे वाटले.

देवयानी शेवटकर यांनी साकारलेकी दुर्गाबाई लुकतुके, विलास शेळके यांनी केलेली हवालदाराची भूमिका, राजेंद्र क्षीरसागर यांनी लुकतुकेची भूमिका, संजय हुडे देवळालकर यांचा इंस्पेक्‍टर या सर्वच कलाकारांनी आपल्या भुकिकेला न्याय देवून कमालीची उंची गाठलीच.

नेपथ्य उत्तम. दोनच सेट. पोलीस स्टेशन आणि घर. इथेच नाटक घडतं. कमी लोकेशन्स असूनही उत्तमपणे कलाकार रंगमंचावर वावरले. नेपथ्य ही नाटकाची महत्वाची आणि जमेची बाजू. काही गोष्टी खटकल्या. त्या टाळता येण्यासारख्याही होत्या. एक दृश्‍य संपल्यानंतर मधला जो ब्लॅक आऊट होतो, तो फार लांब होता. बाकी प्रकाश योजना उत्तमच होती. केशभूषा, आदर्श हेअर ड्‍रेसर्स , वेशभूषा बाळासाहेब कराळे तर रंगभूषा प्रशांत सूर्यवंशी यांनी सांभाळून आपले कौशल्य दाखवले. सौरभ क्षीरसागर यांचं संगीत उत्तमच !

Comments

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com