अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

'चाकोरी' :३२ वर्षांनंतर

'चाकोरी' ३२ वर्षानंतर 

'चाकोरी' हा १९८८ साली सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला लघुपट. चाकोरी म्हणजे चौकट. चाकोरी म्हणजे वर्तुळ. चाकोरी म्हणजे मर्यादा. चाकोरी म्हणजे, व्याकरण ! मात्र, आयुष्य वर्तुळात जगायला, चौकोनात जगायला आयुष्य भूमिती नाही, आयुष्य  भूमिका आहे ! अशी शिकवण हा लघुपट देतो. 'मुक्तता आणि जाणिवांची जाणीव' करून देतो. आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जशी जातीची उतरंड आहे, तशीच उतरंड 'स्त्री-पुरुष' नात्यात आहे.  या स्त्री-पुरुष असमानतेमुळे कोणत्याही क्षेत्राततच नव्हे, तर अगदी चार भिंतीच्या आत सुध्दा कोणत्याही गोष्टीसाठी स्त्रियांना डावलून पुरूषांना प्राथमिकता  दिली जाते. स्त्रियांची गुणवत्ता नाकारल्या जाते, हे आपलं दाहक सामाजिक वास्तव आहे, आणि नेमकं तेच वास्तव चाकोरीतून अधोरेखित केलं. ग्रामीण भागातल्या एका तरुण परित्यकत्या स्त्रीच्या जगण्याची चाकोरी, तिचं आयुष्य 'चाकोरी' या लघुपटामध्ये अतिशय कलात्मक पद्धतीने मांडले आहे. 
आजही गाव खेड्यात जेव्हा  एखादी गोष्ट करायची असेल आणि मुलगा आणि मुलगी यापैकी एकाच्याच पदरात ति गोष्ट पडणार असेल तर त्यावेळेला मुलींना डावलून नेहमीच मुलांना प्राथमिकता दिली जाते. साधं उदाहरण घ्या- घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल आणि घरातील मुलगा वा मुलगी यापैकी एकच जण शिक्षण घेऊ शकत असेल तर मुलगी हुशार असूनही तिची संधी हिरावून मुलाला प्राथमिकता दिल्या जाते.  सामाजिक-आर्थिक व्यवस्थेत महिला या सर्वात खालच्या स्थानी आहेत, म्हणून त्या कमजोर आहेत, असं समजून या पितृसत्ताक व्यवस्थेत कायम त्यांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हीन वागणूक देणं, अत्याचार करणं, शोषण करणं हे अमानवी आहे. त्यामुळेच ही पुरुषसत्ताक व्यवस्था महिलांसाठी तुरुंग असून याच्या जेलर असलेल्या पुरुष वर्गाने स्त्रियांच्या हात पायात बेड्या घालून त्यांच्यावर बंधन लादलेली आहेत. या बंधनाची जाणीव करून देऊन बंधन झुगारून बंड करण्याच्या विचारांचं बीज हा लघुपट अनेकींच्या मनात पेरतो ! प्रतिभा, शैली आणि जीवनदृष्टी हे सुमित्रा भावे यांचं वेगळेपण असून संवेदनशीलता, गांभीर्यता हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे, असं वाटतं. 

या लघुपटाची लघुपटाची कथा  आहे - सीता या सतरा-अठरा  वर्षांच्या तरुण, ‘नवऱ्यानं  टाकून दिलेल्या मुलीच्या आयुष्याची गोष्ट आहे. चाकोरीतील नायिका - सीता ही आई-बाप आणि दोन भाऊ, भावाची बायको - वहिनी आणि आजी अशा कुटुंबात परत येऊन मानहानीचं आणि निमूट कष्टाचं जिणं जगते आहे. एका अंगणवाडी चालवणाऱ्या संस्थेचे काम करणाऱ्या  बाईचं बोलणं तिच्या कानावर पडतं आणि ती चोरून सायकल शिकायचं ठरवते. खरंतर इतकीच या लघुपटाची गोष्ट !  गावच्या एका तथाकथित मॉडर्न जोडप्याला सायकलवर ‘डबल-सीट’ जाताना सीता अनेकदा बघत असते.. सीताच्या घरात एक सायकल आहे, पण ती सायकल सीतेच्या मोठय़ा भावाची, म्हणजे शंकरची आहे. शंकर हा शहरात कामावर आहे.  घरातली ही सायकल अर्थात, ‘प्रॉपर्टी’ सीता या मधल्या बहिणीला सोडून धाकटय़ा भावाकडे म्हणजे, मारोतीकडे जाते. तो छोटा असून ती उंच सायकल दामटत असतो. सीता गोवऱ्या थापत असतांना शेणाच्या पोवट्या वरून सायकल घालून तिच्या तोंडावर शेण उडवत असतो. सीता धाकटय़ा भावाला - मारुतीला' आपल्या शेत-मजुरीतल्या कष्टाने कमावलेल्या पैशातून एक-एक रुपया वाचवून ‘लाच’ देते आणि चोरून सायकल शिकते. एकेदिवशी सीताला प्रोत्साहन देणारी तिची सखी, गौराई तिला अचानक गावासमोर सायकल चालवायला भाग पाडते आणि  समोर ठेवलेल्या पुरुषी सायकल,  दांडी असलेल्या सायकलवर साडी नेसलेल्या अवस्थेत पाय टाकत सीता ती सायकल सर्वासमोर चालवते. आणि सायकलचं पायडलवर पाय ठेवताच सीतेच्या पायातलं पैंजण गळून पडतं! वरपांगी दिसायला कित्ती साधी गोष्ट वाटते ! मात्र, या लघुपटातील सीतेचं सायकल चालवणं ही केवळ एक कृती नाही आहे तर ती एक प्रकारे बंडखोरी आहे. नायिका असलेल्या सीतेच्या हातात सायकल येणं आणि ती सायकल चालवंतांना तिच्या पायातल पैंजण तुटनं हे मालकी हक्क, मुक्त विहार आणि स्वातंत्र्या या गोष्टीचं प्रतीक आहे..! 
सीतेच्या पायातल तुटलेल पैंजण जेव्हा मी पाहिलं, तेव्हा नकळत मला कवी कुसुमाग्रज यांची कविता आठवली-
'सर्वात मधुर स्वर,
ना मैफलीतील गाण्याचा, 
ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा
ना सागराचा, ना कूजनाचा..
ना आमंत्रक ओठातील हसण्याचा; 
सर्वात मधुर स्वर-
कुठे तरी, कोणाच्या तरी
मनगटावरील शृंखला खळाखळा तुटण्याचा !'

सीतेचे जनाबाईशी नातं-
पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये कायम स्त्रियांचे शोषण केल्या  गेलं, हा इतिहास आहे. आणि या रूढी, परंपरा यातून होणाऱ्या शोषणाविरुद्ध बंड करू पाहणाऱ्या स्त्रियांना या समाजाने हीन वागणूक देऊन त्यांचा अतोनात छळ केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. यात अग्रक्रमाने येतात संत जनाबाई आणि सावित्रीबाई फुले. 
डोइचा पदर आला खांद्यावरी l 
भरल्या बाजारी जाईल मी ll
हाती घेइल टाळ, खांद्यावरी विना l
आता मज मना कोण करी ll 
पंढरीच्या पेठे मांडियेले पाल l 
मनगटावरी तेल घाला तुम्ही ll 
जनी म्हने झाले मी वेसवा l
निघाले केशवा घर तुझे ll
हा अभंग भारतातील पहिल्या विद्रोही स्त्री संत कवयत्री जनाबाई यांचा आहे. या अभंगात त्या म्हणतात-
"डोईवरचा पदर मी खांद्यावर घेवून, भरल्या बाजरी जाणार आहे." स्त्री ने मर्यादा ओलांडुन वागू नये. तिने डोक्यावर पदर घेवून धाकात राहावे, ही मनुस्मृतीची सनातन शिकवण - सनातन संस्काराविरुद्ध  जनाबाई विद्रोह करून हे सर्व नाकारतात.  डोईचा पदर खांद्यावर घेऊन भरल्या बाजारी जाणे, हातात टाळ, खांद्यावर वीणा घेऊन नाचणे, पंढरीच्या बाजारपेठेत दुकान लावणे आणि रस्त्यावरच नव्हे तर भर बाजारात येण्याचे जातात. पारंपारीक संस्कार, इज्जत, घरंदाजपणा या मानवनिर्मित वा बंधनाची त्या पर्वा करत नाहीत. पंढरीच्या  पेठेत मी पाल मांडले आहे,  कोणाला मनगटावर तेल घालून किती बोंबलायचे आहे ते बोंबलू देत, मला त्याचा काहीही फरक पडत नाही. असे वागणे वाईट असेल, आणि याला नाव ठेवून वाया गेलेली म्हणत असाल तर , मी वेसवा (व्येश्या)  होवून केशवाच्या घरी जायला तयार आहे ! 
आद्य विद्रोही कवयत्री जनाबाई ह्या बंड करून बंधन झुगारतात. लोकांच्या दृष्टीने जनाबाई धर्म बुडवणारी टवळी आहे. मात्र; त्याची फिकीर जनाबाई करत नाहीत. 
अशाच प्रकारे चाकोरीतली सीता देखील पारंपारिक गोष्टीला नाकारून, सायकल चालवली तर लोकं काय म्हणतील, याची चिंता न वाहता, लोकांकडे दुर्लक्ष करून  बंड करते. सायकल शिकते. जनाबाईची कृती आणि सीतेची कृती ही बंड करणं आहे. त्यामुळे सीतेमध्ये जनाबाईचा अंश आहे, असं वाटतं. सीतेचं जनाबाईशी आंतरिक नातं आहे, हे सीतेची सायकल चालवण्याच्या कृतीतुन कायम जाणवत राहतं.

सीता : एक रूपक -
प्रभू रामचंद्र यांनी माता सीतेला वनवासात पाठवलं. हे सीतेला वनवासात पाठवणं याचा अर्थ, प्रभू रामचंद्र यांनी सीता मातेला 'टाकून' दिलं, असा होता.  त्याअर्थाने, माता सीता मला आद्य ‘टाकलेली’ बाई वाटतात. आणि नायिका सीता देखील माता सीतेचं आजच्या काळातल प्रातिनिधिक उदाहरण आहे. मात्र; आद्य टाकलेल्या स्त्रीपेक्षा आजची काळातली नवऱ्याने टाकून दिलेली सीता, मला कणभर वरचढ वाटते. आजची सीतेला बंधनाची जाणीव झाली. सीता माते प्रमाणे ती शरण जात नाही. ति अग्नीपरीक्षा देत नाही  तर जनाबाई प्रमाणे बंडखोरी करते.   माय सीता हे नवऱ्याने टाकून दिलेल्या समग्र स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे दिग्दर्शकाने नायिकेचं नाव सीता ठेवलं, असेल असं वाटतं. 

चाकोरीतले प्रश्न-
वर उल्लेख केला प्रमाणे चाकोरी १९८८ मधली गोष्ट. चाकोरीतले प्रश्न मात्र गाव खेड्यात अजूनही ३२ वर्षानंतरही जैसे थेच आहेत. 
या लघुपटातल्या एका प्रसंगात, जेव्हा सीता दुकानात आपल्या मैत्रिणी बरोबर छटाकभर तेल आणायला जाते, तेव्हा दुकानातील एक ग्राहक महिला  सीतेला विचारते, 'कधी येणार न्यायला ? '  
सीता म्हणते, 'उरसाला येणार न्यायला'
दुकानदार त्या ग्राहक स्त्रीला म्हणतो,  एकदा 'टाकलेल्या' बाईला पुन्हा कुठं नांदायला नेतात !' 
आजही परित्याकत्या स्त्रीला गावाकडे 'टाकून दिली' हा शब्द  वापरतात. 
टाकून द्यायला ती स्त्री का वस्तू आहे ? आजही गावाकडे घरोघरी ‘परित्यक्ता' स्त्रियांना  ‘नवऱ्याने टाकलेली' हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. 

दुसऱ्या एका प्रसंगात चार दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या आणि नवऱ्याने माहेरी पाठवून दिलेल्या मुलीचा (गंगा) बाप म्हणतो, 'तिला नवऱ्याकडून पोटगी मिळेल ! द्यावीच लागेल त्याला.' 
मात्र, आज मुलींसाठी पोटगी मागणारा बाप स्वतःच्या प्रॉपटी मध्ये मुलीला वाटा देतो का ? 

प्रसंग तिसरा- 
सीता आणि गौराई कपडे धुवून येतात. गौराई दारात पोहोचते न पोहोचते तिची माय म्हणते, कितीदा सांगितलं त्या अपशकुनी पोरी बरोबर जात जाऊ नको ! परित्याकत्या स्त्रिया अपशकुनी असतात का ? 

प्रसंग चौथा- 
गावात एक लग्न असतं. सीतेची मैत्रीण तिला बोलवायला येते. 
मैत्रीण - सीते तू नाही येणार ?
आई - ती नाही येणार, ती म्हातारी सोबत राखेल ! 
आजही परित्याकत्या स्त्रीला सामाजिक, कौटूंबिक सोहळ्यात सहभागी करून घेतल्या जातं नाही. 

सिमोन द बुवा यांचं एक विधान आहे, स्त्री जन्मत नाही तर घडवली जाते' अगदी तसंच पुरुष जन्माला येत नाही, तर तो घडवला जातो. आपण जन्म घेतो तेव्हा फक्त एक तान्ह बाळ असतो... पिल्लू असतो आपण. मात्र, जन्मल्यावर त्या बाळाला तर आपण कोण आहोत, माहिती नसते. ते त्याला सांगितले जाते की तो पुरुष आहे की स्त्री. आणि तिथून लिंगभावाची रुजवात आपल्या मनात होते. अगदी लहान मुलं खेळतांना देखील आपण भेदभाव करतो, मुलगी असले तर खेळायला भांडी, बाहुली देतो आणि मुलगा असेल झुग झुग आगगाडी देतो. 
सीतेला सायकल चोरून शिकावी लागते, तर तिचा भाऊ मारोती सगळ्या देखत सायकल चालवतो. त्यामुळे हा चित्रपट केवळ बंधन, स्वातंत्र्य यावरच भाष्य करत नाही, तर लिंगभाव देखील अधोरेखित करून स्त्रीपण पुरुषपण हे बाजूला सारून माणसाला माणूस बनवण्याकडे घेऊन जातो ! सामाजिक लिंग भेद ही गोष्ट मानवनिर्मित असून  चौकटीतल्या तथाकथित संस्कारांना चुना लावून 'चाकोरी' आपल्याला चौकटी बाहेरचं व्याकरण शिकवते !  असं व्याकरण, ज्यात स्त्री - पुरुष हे भेद नसतील. अर्थात, हा लघुपट समानतेची बाराखडी शिकवतो.
हीन वागणूक, सामाजिक बहिष्कार, बंधन यांच्यावर जोरकस भाष्य करत फाट्यावर मारणाऱ्या या लघुपटाची गोष्ट अनेक स्त्रियांची दुखत कहाणी आहे. काहींनी पैंजण तोडली, तर काहींच्या पायातल पैंजण अजूनही घट्ट आहे ! ज्यांच्या पायातली पैंजण अजूनही घट्ट आहेत, त्यांना मला तस्लिमा नसरिन याचं वाक्य सांगावंस वाटतं-
तस्लिमा नसरीन म्हणतात- 
समाजाच्या दृष्टीनं मी 'नष्ट' म्हणजे 'वाया गेलेली' आहे. असं स्वतःला म्हणवून घेणं मला आवडतं. कारण जी स्त्री स्वतःचं दुःख, दैन्य, दुर्दशा, दूर करायला बघते, धर्म, समाज आणि राष्ट्र यांच्यांतील गलिच्छ नियमांना विरोध करायला खंबीरपणे उभी राहते, तिचा अपमान करणाऱ्या गोष्टींना विरोध करते, स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असते, तिला समाजातील सभ्य लोक 'नष्ट' म्हणतात, हे सत्य आहे. स्त्रीला सुधारायचं असेल, तर पहिली अट तिनं 'नष्ट' व्हायला पाहिजे. समाजाच्या दृष्टीनं 'नष्ट' झाल्याशिवाय समाजाच्या कचाट्यातून स्त्रीची सुटका होणं शक्य नाही. 
लोक ज्या स्त्रीला 'नष्ट' म्हणतात, तीच खरी निकोप आणि बुद्धिमान माणूस असते.  (संदर्भ- नष्ट मेयेर नष्ट गद्य, अनुवाद- मृणालिनी गडकरी)

पूर्वी भलेही स्त्रिया पिंजऱ्यामध्ये बंद असतील, परंतु आता पिंजऱ्याचं दार सताड उघडं आहे. स्त्रियांनी बाहेर, आकाशामध्ये स्वैर मोकळीक घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र पिंजऱ्याचं- तुरुंगाचं दार उघडलेलं असलं, तरी पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांच्या पंखांचं खच्चीकरण केल्यामुळे उंच झोका घेऊन निळ्या आसमंतात मुक्त विहार करणं ही गोष्ट स्त्रियांसाठी अजूनही तेवढी सोपी नाही. बऱ्याचदा आपण ऐकतो- 'सोन्या सारखा संसार आहे. सगळं सुख तिला घर बसल्या चार भितींच्या आत मिळतं. तिला कसंल दुःख असेल?' शिवाय, तिला पुरुष मंडळी कडून सतत ऐकवलं जातं- कशाला पडतेस बाहेर, मिळतं ना तुला सगळं घरी !' किंवा लग्न ठरवतानाही 'जॉबवाली मुलगी नको/ नाकापेक्षा मोती जड नको' अट असते. का नाही होणार एखाद्या स्त्रीला दुःख ? दुःख होतं, तिचे पंख कुणीतरी छाटत यांचं !
अनेक महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. मग त्या खेळाडू सानिया नेहवाल असो, कल्पना चावला, लोकसभेच्या सभापती असलेल्या मीराकुमार असोत, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असो... मुली मध्ये गुणवत्ता आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही हुंड्यासाठी जाळून मारल्या जातात.. विहीरीत जीव देतात.. हा खूप मोठा विरोध आहे. स्त्रीमुक्तीचं गीत गातांना ग्रामीण भागातील महिलांची वेदना न टाळून तिला भान देणं, हे काम हा लघुपट करतो ! नेहमीच्या चाकोरिचा (रुटीन) च्याही पल्याड एक मोठं अवकाश आहे, यांचं जाणीव हा लघुपट करून देतो. 

'चाकोरी' ही स्त्रियावरील बंधनाची कालातीत गोष्ट ठरू नये, असं खूप आतून वाटतं. यातलं बंधन ही कुणाच्या आयुष्यात न कोरली जाता, तुटलेले पैंजण कुठलीही  ‘कुमारी, ‘प्रौढ कुमारी,' ‘सौभाग्यकांक्षिणी’,  ‘घटस्फोटिता’  ‘परित्यक्ता’,  ‘विधवा' या प्रत्येक  स्त्रीच्या  काळजावर कोरल्या जावं! बंधन, विषमता  झुगारून स्वातंत्र्य मिळवणारी ही गोष्ट माणसाला माणूस करो !
 
'चाकोरि'चा  प्रत्येक संवाद हा अस्सल ग्रामीण बाज असलेला असून प्रत्येक फ्रेम सामाजिक चौकटीत होणारी घुसमट मांडते, प्रत्येक फ्रेम केवळ देखणीच नाही तर प्रचंड बोलकी आहे,  स्टेरीओटाईपला धक्के देणारी आहे. सगळ्याच कलाकारांचं काम दमदार असून असं वाटतं होतं की, कलाकार अभिनय करत नसून प्रत्यक्ष ते जगणं जगतात ! यातील पार्श्वसंगीताने काळीज चिरत नेलं. अस्वस्थ केलं. चित्र आणि ध्वनी यांचा योग्य मिलाफ झाल्याने त्यांचा परिणाम अंतमनावर होणं साहजिक आहे, त्यामुळे पैंजण तुटत तेव्हा डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. एक संवेदनशील माणूस म्हणून मला हा लघुपट तर आवडलाच, शिवाय हा लघुपट  14 आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला असून त्याला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत
चित्रपट महोत्सवात समीक्षकांनी देखील या लघुपटाची दखल घेतली.  मी स्वतः काही समीक्षक नाही. केवळ कलाकृतींचा आस्वास घेणारा एक आस्वादक आहे. तरीही मला सांगावस वाटतं, या लघुपटातील मूल्ये ही केवळ स्त्रीवादी मूल्ये आहेत, असं म्हणून मी या कथेतील विचाराला संकुचित अर्थ घेणार नाही. तर मला या कथेतील मूल्ये ही मानवतावादी मूल्ये वाटतात. त्यामुळे चाकोरी ही मुक्तीचा अभंग कविता आहे. विद्रोहाचं गाणं आहे !
 
कुठल्याही स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या अंगावरील दाग - दागिने नसून तिचं 'स्वातंत्र्य हेच तिचं खरं सौंदर्य असतं. परित्यकत्या  स्त्रियांचं जगणं म्हणजे विस्तव असतं. हक्काचं घर नसतं. नवरा स्वीकारत नाही आणि माहेरी कष्टाचं जीनं जगावं लागतं. नेमकं आपलं  घरं तरी कुठलं? हा प्रश्न सतत तिच्या डोक्यात येतो. तेव्हा ख्यातनाम पंजाबी लेखिका अमृता यांच्या कवितेच्या पंक्ती आठवल्या - 'जहां भी स्वतंत्र रूह की झलक पडे, समझना- वह मेरा घर है !'

आपल्याला मना सारखं जगता यावं म्हणून, आपल्याला बंधन नको असतात. त्यामुळेच आजादी ही प्राणापेक्षाही प्रिय असते.. स्वतःच्या मनासारखं जगता येणं, हवं ते करता येणं, स्वप्नाला सत्यात उतरवणं कित्ती.. काय..काय असत ना स्वातंत्र्यात !  म्हणून मला पाश ची कविता आठवते- सबसे खतरनाक होता है, हमारे सपनो का मर जाना !
जा, तोडून ताक त्या पायातल्या साखळ्या, ज्या तुला बंदिस्त करू पाहत आहेत ! मुक्त हो ! उड !! जगाची तमा न बाळगता जग, तुला हवं तसं !!!

जितने भी तंग दायरे हैं सारे तोड़ दे
अब आ खुली फ़िज़ाओं में अब कायनात लिख !
-जावेद अख्तर 

'चाकोरी' हा लघुपट पाहण्यासाठी लिंक- 
https://youtu.be/CV9oT8kkzxE

-कबीर उषा लक्ष्मण बोबडे
ईमेल - kabirbobade09@gmail.com

Comments

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com