अश्लील उद्योग : चौकटी बाहेरचा प्रयत्न !
अश्लील उद्योग : चौकटी बाहेरचा प्रयत्न !
'अश्लील उद्योग मित्र मंडळ' हा आलोक राजवाडे दिग्दर्शित आणि धर्मकीर्ती सुमंत लिखित सिनेमा वास्तव आणि फॅन्टसी यांचं अजब मिश्रण असलेला सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा एक आगळा वेगळा प्रयोगशील प्रयत्न आहे. नेहमीच्या पारंपारिक चित्रपट विषयांपेक्षा वेगळ्या धाटणीचा, चौकटी बाहेरच्या विषयाचा हा चित्रपट असून श्लील - अश्लील हा वाद निरर्थक असून या चित्रपटाचा विचार कलात्मक औचित्याच्या दृष्टीने, आशयाच्या दृष्टीने, आणि कलात्मक सत्याच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे, असे वाटते. सेक्स आणि प्रेम या दोन्ही गोष्टीचं त्या-त्या जागी असणारं महत्त्व अधोरेखित करणारा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा हा सिनेमा आहे. आपल्याकडे काही प्रयोगशिल दिग्दर्शक वेगळे विषय मांडतात, त्यामुळे समीक्षकांनी सम्यक बुद्धीने समीक्षा करणे गरजेचे आहे. मात्र, जे सिनेमात नाहीच, यावरच बरेच चित्रपट समीक्षक बोलतात, आणि जे चित्रपटात आहे, त्याची समीक्षा राहते बाजूला ! शिवाय, उणीवा दाखवणं, चुकांवर बोट ठेवून त्या लक्षात आणून देणं, यात गैर नाही, पण कलाकृतीला चुकीचा शेरा मारणे योग्य नाही. तसं करणं हे कोतेपणाचे लक्षण आहे. अशा समीक्षेने प्रेक्षकही एका वेगळ्या, प्रयोगशिल प्रयोगाला मुकतात व असे धाटणीचे प्रयोग करू पाहणाऱ्या दिग्दर्शक- निर्मात्यांचं नुकसान होतं. शिवाय, सिनेमा न बघता केवळ 'अश्लील उद्योग मित्रमंडळ’ या नावावर जाऊन चित्रपटाविषयी ठोकताळे बांधत असाल तर तुम्ही नक्कीच, एका प्रयोगशिल चित्रपटाला मुकाल ! हा नवा प्रयोग असलेला सिनेमा नक्कीच पाहायला हवा!
कुठलाही सृजनशील कलावंत माणसाच्या मनाचा, माणसांमाणसंधील नात्याचा शोध घेत असतो. असे मन, नाते जे तथाकथित रूढी वा परंपरा यांच्याही पलीकडे गेलेले असते, आणि दिग्दर्शकाने तारुण्य अवस्थेतील मुलांच्या भावविश्वाचा साहसी शोध घेण्याचा उत्तम प्रयत्न केला. त्यामुळे हा चित्रपट मुक्त आणि परिपकक्व वाटतो. चित्रपट बघतांना दिग्दर्शकाच्या विशाल जीवनदृष्टीचा प्रत्यय येतो. मात्र, फिक्शन कलावस्तू मधील जीवनदृष्टी समजून घेणे बऱ्याचदा प्रेक्षकाला कठीण जाते. तो त्या कलाकृतीचा दोष नसतो. तो प्रेक्षक म्हणून आपली मर्यादा असते. कारण, दिग्दर्शकाला जे म्हणायचं असतं, ते समजून घेण्यासाठी आंतरशाखेयी अभ्यास लागतो. आंतरशाखेय संदर्भ लागतात. आणि प्रेक्षक म्हणून आपणही बऱ्याचदा आपली इयत्ता वाढवण्यासाठी फारसे प्रयत्न न करता कलावस्तूला नावे ठेवण्यात धन्यता मानतो !
कॉमिक पॉर्न स्टारचं असणारं आकर्षण, पॉर्न स्टार मधली भावनिक गुंतवणूक, तरुण पिढीचा सेक्स, एकूणच सेक्शुएलिटीबाबत असणारा दृष्टीकोन आणि यात सगळ्यात गुरफटत जाणारं त्यांचं तारुण्य, अशी काहीशी ढोबळ मानाने या चित्रपटाची कथा असून हा सिनेमा थिएटर मध्ये बघण्यातच मजा आहे. त्यामुळे कथा सांगून चित्रपट बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता कमी होईल, म्हणून कथा न सांगता या प्रयोगशिल दिग्दर्शकाच्या चौकटी बाहेरच्या सिनेमा बद्दल लिहिणं गरजेचं वाटतं.
अश्लील सिनेमा म्हणून या सिनेमा विषयी आवई उठवल्या गेली. पण, श्लील - अश्लील म्हणजे तरी नक्की काय ?
प्रा. र धो कर्वे म्हणतात तसं, अश्लीलता हा कुठल्याही वस्तूचा गुण नसून तो बघणाऱ्याच्या नजरेचा दोष आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे पाठ फिरवणाऱ्या, नाक मुरडणाऱ्या प्रेक्षकांनी या चित्रपटाला अश्लील ठरवण्यापूर्वी विवेकी विचार करावा. अश्लील उद्योग' ही कलावस्तू अप्रत्यक्षपणे प्रेक्षकांच्या अनुभूतीच्या कक्षा रुंदावून प्रेक्षकांच्या विचारांचा परीघ नक्की वाढवतो. ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ हा सिनेमा लैंगिक शिक्षणाच्या अभावाला अधोरेखित करतो. आजच्या तरुण पिढीची लैंगिक, सम लैंगिकता, मानसिक आणि भावनिक एकटेपणा, घालमेल हे मुद्दे कथेच्या केंद्रस्थानी आहेत. कल्पनेतले पात्र भाभी... तारुण्यातील मुलांची फँटसी... एका कॉमिकच्या रुपानं हे पात्र अनेक मुलांच्या आयुष्यात आलं. याच पात्राचा आधार घेत सेक्शुअल फँटसी, सहजपणे उपलब्ध असणारे पॉर्न आणि त्याच्या आहारी गेलेली तरूण पीढी हा विषय अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटातून हाताळण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला. अश्लील उद्योग' ही एका वासनेच्या आहारी गेलेल्या तरुणाची आहे. वयात येणं म्हणजे नक्की काय होतं, तेव्हा काय करायचं या प्रश्नांचा चित्रपटाचा नायक आतिषच्या शोधाची कहाणी म्हणजे 'अश्लील उद्योग मित्र मंडळ'.
आतिश हा पुण्या सारख्या शहरात राहणारा तरुण असून पूर्णपणे लैंगिक वासनेच्या आहारी गेलेला. त्याला शाळेत असल्यापासून लैंगिकतेबद्दल प्रचंड आकर्षण असतं. त्यातूनच टीव्हीवर पॉर्न व्हिडिओ पाहणं, पॉर्न कॉमिक्स वाचणं यात तो वाहवत जातो, गुरफटत जातो. तो सनाच्या प्रेमात पडतो. त्याला त्यांच्या नात्यात देखील वासनेशिवाय काहीच सुचत नाही. दिसत नाही. आणि एके दिवशी कॉलेजच्या लेडीज टॉयलेट मध्ये दोघात अघटित असं काहीतरी घडतं आणि त्यामुळे दोघांत वाद व्हायला लागतात. दिवस-रात्र त्याच विचारात गुंग राहणाऱ्या आतिषला कॉमिक्समधलं एक काल्पनिक पात्र भाभी असल्याचा भास व्हायला लागतो. आणि याच भासाला घेऊन तो जे काही करतो, त्यातून आतिषच्या आयुष्यात एक वळणं येतं.. त्याच्या मनातल्या प्रश्नांचा गुंता ते काल्पनिक पात्र सोडवते.. त्यामुळे ते काल्पनिक पात्र त्याला अधिक जवळचं वाटू लागतं.
वास्तव आणि अवास्तवाच्या सरमिसळ ही एक भन्नाट कल्पना होती. मात्र, संहिता लेखन फसल्यामुळे चित्रपट प्रभावी वाटत नाही. अनेम ठिकाणी हे कथानक भरकटत जाते. या चित्रपटातल्या काही जागा आवडल्या. जसं- एकतर आतिशचं सनासाठी खदखदणारं प्रेम ! तर काही जागा खटकल्या, जसं - एका ऑडीशन घेण्याच्या प्रसंगात चित्रपट लेखकाने निव्वळ स्त्रियांची हेळसांड केलेली दिसते. चित्र - विचित्र हावभाव स्त्री पात्राकडून करून घेतले.
सिनेमाचा विषय हा तारुण्यातील लैंगिक वंचितपणातल्या भाव विश्वाशी संबंधित आहे खरय, पण, या विषयासोबतच एखाद्या तरुणाच्या आयुष्यात अन्य गोंधळून टाकणाऱ्या गोष्टी घडत असतात आणि त्यात मिसळलेला ‘अब्सर्डपणा’ वा मनाचे कल्पित खेळ या गोष्टींनी सिनेमाचा एकूण माहोल जो तयार होतो तो या पिढीतल्या तरुणांना रिलेट होणारा आहे असं म्हणता येईल. यातील फॅन्टसी अनेकांना आवडू शकते.
मुळात कुठलीही कला ही व्यक्तीच्या कलात्मक जाणिवांचा सामाजिक आविष्कार असतो.
‘पॉर्न कॉमिक्स आणि आयपीएलनं तुमच्या पिढीचं बोन्साय केलंय.’ असं सविता भाभी आतिषला म्हणते. ते सविता भाभीचं बोलणं म्हणजे, लैंगिक शिक्षणाचा अभाव यावर भाष्य करणं झालं ! त्यामुळे ही केवळ तारुण्यातील घुसमट नाही, तर व्यक्तीकडून समष्टीकडे असा या चित्रपटाचा प्रवास आहे.
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’तील बऱ्याच प्रसंगात लोकेशन इस्टेब्लिश होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा नेमकं काय चाललय, या बाबत प्रेक्षक संभ्रमित होतो. बऱ्याच गोष्टीला तर्क नाही. त्यामुळे नेमकं दिग्दर्शक आणि लेखकाला काय म्हणायचं, तेच कळत नाही. परिणामी, लेखकच गोंधळलेल्या असवस्थेत आहे, असं वाटतं. सिनेमाचा पूर्वार्ध थोडा कंटाळवाणा वाटतो, तर उत्तरार्ध बऱ्यापैकी जमलाय. संवाद आणि पटकथा सुमंत यांची आहे. त्यांचे काही संवाद जसं, 'मुलगा आईच्या पोटात असतो तेव्हा आई आणि मुलगा एकच असतात. त्याचा जन्म झाल्यावर तो एकटा पडतो. मुलीला आई होवून पुन्हा एकरूप होण्याची संधी असते परंतु पुरुषाला ती मिळत नाही. पुरुषाची पार्टनर त्याचा एकटेपणा दूर करू शकते' किंवा, 'आपल्याला प्रश्न पडायला हवेत' तरच आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होईल.' प्रेक्षकगृहातून बाहेर पडल्या नंतरही लक्ष्यात राहतात. तरुणाच्या मनातल्या घुसमटीला लक्षात घेऊन लिहिलेले संवाद परिणामकारक ठरतात. मात्र, तरीही बरेच संवाद आणि दृश्य ही असंबंध- अननेसेसरी वाटतात. शिवाय, चित्रपट लेखकाला नेमकं काय म्हणायचं, ते देखील स्पष्टपणे कळत नाही. मुळात चित्रपट कथेत कथात्मकता, नाट्यात्मकता, आणि भावात्मकता यांचे योग्य गुणोत्तर दिसत नाही. किंबहुना, कथानक प्रेक्षकाला गुंतवून ठेण्यात सफसेल अपयशी ठरले !
कॅमेऱ्याची प्रत्येक फ्रेम प्रभावी आहे. शॉट टेकिंग उत्तम जमलंय. दिग्दर्शक म्हणून आलोकने या विषय उत्तम पेललाय. अभिनय शैली, कलात्मकता आणि तांत्रिक बाजूंची सांगड सिनेमात दिसून येते. अभिनयाच्या दृष्टीने पर्ण पेठे चा अभिनय उत्तम असून तिचा सोजवळ - निरागसपणा तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी योग्य आहे. इतर कलाकारांचा अभिनय जेमतेम आहे.
संवादांच्या आणि स्वगतांच्या माध्यमातून चमच्याने दूध पाजण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न खटकला ! स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याच्या नादात, दिग्दर्शक-लेखक यांना प्रतिभा, शैली, आणि जीवनदृष्टी या वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या गोष्टीचा विसर पडलेला दिसला !
कुठलीही कलावस्तू हा एक प्रयोग असते. त्यामुळे त्या कलाकृतीत जशा उत्तम बाजू असतात, तशा उणीवा देखील असतात. त्यामुळे 'अश्लिल उद्योग'कडे केवळ एक प्रयोगशील प्रयोग म्हणून पाहिल्यास आलोक कडून येणाऱ्या काळात निश्चितच चांगल्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही !
चित्रपट: अश्लील उद्योग मित्रमंडळ
निर्मिती: गौरी आणि बनी दालमिया, सुरेश देशमाने आणि विनोद सातव
दिग्दर्शन: आलोक राजवाडे
लेखन: धर्मकीर्ती सुमंत
स्टार कास्ट: अभय महाजन, पर्ण पेठे, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, विराट मडके, अमेय वाघ आणि सई ताम्हणकर
-कबीर उषा लक्ष्मण बोबडे
ईमेल - kabirbobade09@gmail.com
मो. ७३५००३९२०९
Comments
Post a Comment