अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

कलावंताला समाजाकडून अँप्रिशिएशन मागणाचा हक्क असतो !

कलावंताला समाजाकडून अँप्रिशिएशन मागणाचा हक्क असतो !
-सुमित्रा भावे 

(कराड येथील 'अभिरुची' फिल्म्स क्लब च्या वार्षिक महोत्सवानिमित्त दि. २९ फेब्रुवारी रोजी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची वर्षा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. शब्दांकन - कबीर उषा लक्ष्मण बोबडे) 

तुमचं औपचारिक शिक्षण हे राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयात झालेलं आहे. चित्रपट निर्मिती ही खरंतर गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात अनेक विद्या शाखा, अनेक तांत्रिक बाबी येतात.  मात्र सिनेमाचं कुठलेही औपचारिक शिक्षण घेतलेलं नसतांना देखील तुम्ही चित्रपट केले. आम्हाला याचा समजलं कारण म्हणजे - 'उपजत प्रतिभा' ! तुम्ही त्याच्याविषयी काय सांगाल ? 
-  नमस्कार पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांची माफी मागते. कारण माझं बोलणं ऐकतांना तुम्हाला खडबडीत रस्त्यावरून चालल्यासारखं वाटणार आहे.  माझा आवाज सुमधुर वगैरे नाहीये. तो खराब झालेला आहे.

चकचकीत रस्त्यावरून पडल्यापेक्षा आम्हाला खडबडीत रस्त्यावरून चालायला आवडेल !

- मी समाजशास्त्राचा अभ्यास केला. राज्यशास्त्राचा अभ्यास केला आहे ; पण त्याहीपेक्षा जास्त मी समाजकार्याचा अभ्यास केला. म्हणजे,  माझा डबल एम.ए. आहे. सोशिओलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स मधली केमे आहेत आणि मास्टर ऑफ सोशल वर्क हे शिक्षण टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूट मधून पूर्ण केलं.  त्यामुळे मुळातच मी व्यवसाय स्वीकारला होतात तो की, माणसाच्या मनाला समाधान लाभेल आणि ते समाधान लाभावे यासाठी त्याच्यासमोरच जे काही प्रश्न असतील ते प्रश्न कसे बदलता येतील, त्यासाठी माणसाचं मन, त्याचे एकूण व्यक्तिमत्त्व, कृती आणि  वर्तन हे सगळं कसं बदलता येईल ? ते बदलता बदलता ज्या समाजापासून तो माणूस स्वस्थ किंवा अस्वस्थ होतो, तो समाजही अधिक स्वस्थतेच्या दिशेने जाण्यासाठी कसा बदलता येईल, हे माझं कामाचं क्षेत्र होतं.  त्यामुळे आपोआपच मी माणसांच्या मनाचा, माणसा माणसांमधल्या नात्याचा, माणूस आणि समाज यांच्या नात्याचा आणि नंतर मी जास्त जागृत होत गेले, तसं 'माणूस आणि निसर्ग' यांच्यातील नात्याचा अभ्यास मी केला. अजूनही करतेच आहे आणि तो अभ्यास करत असतांना  मला मला जे समजलं, मला जे वाटतं, ते दुसरा माणसांपर्यंत कसं पोहोचवायचं, हा प्रश्न सतत माझ्या मनात असायचा. ते पोहोचविण्यासाठी सुयोग्य अशी भाषा सापडणं महत्त्व होतं.  चित्रपट माध्यमात ती भाषा सापडलेली. कुठल्याही भाषेचा उपयोग होतो संवाद साधण्यासाठी ! शक्य होईल तितके त्या भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय तुम्हाला काय म्हणायचं ते दुसऱ्या माणसापर्यंत कसं पोचणार ?  समजा  आपल्याला कुणी मल्याळी किंवा चिनी माणूस भेटला आणि तो फार मनापासून बोलतो आपल्याशी.  आपल्याला त्याचा पोटतिडकीने बोलतांनाचा चेहरा दिसतो.  पण त्याचे शब्द कळत नाहीत. मग काय करायचं ? कसं समजून घ्यायचं ? कसा संवाद साधायचा ? हा सगळा विचार करतांना लक्षात आलं, दृश्य  भाषा कळणं आणि नकळणं यापलीकडे ती भाषा आपल्याला नेत असते.  तिला मर्यादा नसते.  म्हणून असं वाटलं, परभाषेतल्या  लोकांसाठी, आपल्याच भाषेतील निरक्षर लोकांसाठी जरी आपल्याला सिनेमा बनवता आला तर आपल्याला जे म्हणायचं ते माणसांना सांगता येईल ! म्हणून  मग मी चित्रपट करायला लागले.

म्हणजे चित्रपट निर्मिती करतांना मनात एक विशिष्ट हेतू होता.  आम्ही नेटवर उपलब्ध असलेले तुमचे जे  चित्रपट बघितले त्या सगळ्यातून एखाद्याचा आजार,  मानसिक आजार, शाळांमधल्या समस्या, वेगळे कायदे हे विशिष्ट हेतू वा प्रश्न मनात ठेवून आपण चित्रपट निर्मिती केली आहे. तर,  हेतुपूर्वक काम करतांना त्यातही उत्स्फूर्तपणा टिकवून ठेवायला कसं जमतं ? 
- त्यातला उत्स्फूर्तपणा टिकवून ठेवते की नाही, हे मला माहिती नाही.  पण आपल्याला आपल्या मनातलं जे दुसऱ्या माणसाला सांगायचं ते काय पद्धतीने सांगायचं ? तू असं वागतो, असं वागू नको,  हे वागलास/वागलीस  तर तुला छान वाटेल. शांती मिळेल. अमुक पद्धतीचे वागलास / वागलीस तर तुमच्या आयुष्यात आणखीन प्रश्न तयार होतील. हे असं शब्दातून जर एकमेकांना सांगितलं तर त्यातून फार काही  साधलं जातं, असा माझा अनुभव नाही. कारण, माणसाला उपदेश नको असतो. आणि ते सहाजिकच आहे.  कारण प्रत्येक माणूस आतून आपल्या परीने काहीतरी शोधत असतो. काहीतरी साधत असतो.  कुठला न् कुठला संघर्ष करत असतो. त्यातून बाहेर येत असतो.  मग तरीही तुम्हाला दुसऱ्या माणसाला काहीतरी सांगायचं असतं तर कसं सांगायचं ? तर,  एका माणसाला दुसऱ्या माणसाची गोष्ट ऐकायला आवडते.  तू असं कर, तू तसं कर हे न सांगता - एक माणूस होता आणि त्याच्या आयुष्यात असं असं घडत गेलं आणि शेवटी त्याच्यासोबत असं झालं ! तर  अशाप्रकारे सांगितलं तर ऐकायला बरं वाटतं. अगदी वाईट शब्दात सांगायचं तर सगळ्यांना एक प्रकारे 'गॉसिप्स' लागतात.  कारण माणसांच्या कथा ऐकायला आपल्या सगळ्यांना आवडते.  त्यामुळे आपल्याला जे सांगायचं ते कथारूपामधून सांगायचं,  हे मी अगदी पहिल्या लघुपटाच्या वेळीच ठरवून टाकलं होतं आणि तेव्हापासून अनेक सामाजिक प्रश्नांवर, आरोग्याच्या प्रश्नावर जे काही चित्रपट केले ते सगळे कथात्मक चित्रपट आहेत.  शिवाय मला असं वाटतं की,  कथेमध्ये काय असतं- तर माणसा माणसांची खूप गुंतलेली नाती असतात.  तो गुंता इतका मोठा असतो की सबंध सोडवून  दाखवणं यापेक्षा तो माणसांच्या समोर मांडणे आणि तो अशा पद्धतीने मांडणं की, त्या ऐकणाऱ्या माणसाच्या भावनेला स्पर्श करेल.  त्या माणसाच्या स्वतःच्या आंतरिक अनुभव आणि स्वतःचे सत्त्व जागं होईल.  अशा पद्धतीचा तो अनुभव असला पाहिजे.

गॉसिपचे इतके चांगले उदात्तीकरण आणि तेही रचनात्मक पद्धतीने करून सिनेमा करता..!  तुम्ही म्हणाला तसं चित्रपटात माणसं आहेत.  विशेषत: तुमच्या चित्रपटातील पात्रांना पाहतांना असं वाटतं की,  आपल्याच आजूबाजूच्या माणसांचं हे कथानक आहे.  कुठल्या परग्रहावरच्या माणसाची ही गोष्ट नाही. उदाहरणार्थ - आईचा आणि मुलाचा वाद चालू आहे. 'भारत माझा' मधे असा  प्रसंग आहे. तर मुलगा चुकतो म्हणून आई दूषणं देते... असे प्रसंग नेहमीच आमच्या आजूबाजूला बघतो. पण तुम्हाला त्या मुलाचे दुःख जाणवतं, त्याची वेदना कळते, तर यासाठी तुम्ही नेमकी काय साधना करतात ? 
- साधना वगैरे नाही. फक्त माणसांत खोल बघते. मला माणसांशी फार सहानुभूती वाटते. मला असं वाटतं, आपल्या सगळ्यांमध्ये एक बिचारेपणा लपलेला आहे. आपण सगळी माणसं बिचारी आहोत. ही सगळी सृष्टी नाशवंत आहे याविषयीची जाणीव हाच तो खोल उतरत जाणारा बिचारेपपणा आहे. त्या बिचारेपणातून आपण सगळे मैत्री, प्रेम यातून एक प्रकारे आधार शोधत असतो. बिचारेपणामुळे माणसं प्रेमासाठी, मायेसाठी- जिव्हाळ्यासाठी आतुर असतात. प्रेम-मैत्री-माया यातून आधार मिळवण्यासाठी धडपडत असतात.  तर हा सगळा जो आधार शोधण्याचा माणसाचा शोध आहे,  त्या शोधाचे मुळ दुःख असतं,  असं मी म्हणणार.  पण यासोबतच  काहीतरी सखोल जाणारी अस्वस्थता तरी नक्की आहे.  त्यामुळे कुठल्याही माणसाबद्दल जजमेंटल होऊन, हा माणूस कसा आहे, ही स्त्री अशी आहे, असं मला करावसं वाटत नाही.  जजमेंटल व्हावं असं वाटत नाही.  त्याच्या आतमध्ये होणारी आंतरिक खळबळ कुठेतरी माझ्याही आत चालू राहते. त्यामुळे त्याची खळबळ  माझ्याशी नातं जोडते. अस्वस्थ करते. त्यामुळे त्या खळबळीशी जाऊन पोहोचण्याचा माझा प्रयत्न असतो.

कदाचित आमच्या कुटुंबांमध्ये, मित्रांमध्ये निराशा, ताण असलेली माणसं आमच्या सोबत जगत असतातच.  त्यामुळे तुमचे चित्रपट पाहिल्यानंतर त्या भोवतालच्या माणसांचा दुःख कळतं.... दुसरं असं, सिनेमा पाहून झाल्यानंतर काय लक्षात राहते,  तर तुमच्या चित्रपटातली वास्तू लक्षात राहतात. वास्तुपुरुष मधला वाडा, दोघींमधील शेतकऱ्यांचे घर, भारत माझा मधील एका सामान्य माणसाचं घर हे सगळं मनात राहतं. तर वास्तू निवडीबाबत तुमचं काय मत असतं- 
- मी नुसती वास्तु म्हणणार नाही. वास्तूच्या बरोबरीने येणारी डेकोरेशन, वस्तूंची मांडणी, माणसांचे पोशाख, त्या वस्तूमध्ये येणारे सगळे ध्वनी,  कुठे कावळा ओरडतो, कुठं पक्षी चिवचिवतात, बाहेर गायीचा हंबरकणं चालू असतं, किंवा रस्त्यावरच्या मोटारीचा आवाज येतो. भरगाव वेगाने जाणाऱ्या अम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज  येतो. या सगळ्यासह आपला अनुभव असतो. एरवी आपण यातल्या तपशीलासंदर्भात एवढे जागरूक नसतो. पण जेव्हा तुम्ही एखादा अनुभवाचं रूपांतर कलेमध्ये करतात. मग ते चित्र असेल, संगीत असेल वा ललित कलाकृती असेल, त्यावेळी तुम्ही त्या अनुभवाला एक चौकट देत असतात आणि त्या अनुभवाला चौकट दिल्यानंतर तुम्ही त्या चौकटीतल्या अनुभवांच्या बारीक-बारीक कणांकडे, गोष्टींकडे निरखून पाहतात. त्या अनुभवाच्या संयुगांना कल्पनेची जोड देता. त्यामुळे कलात्मकतेची चौकट ही एक बांधीव कंपोझिशन आहेच शिवाय, विशेषतः चित्रपट ही स्ट्रक्चरल आर्ट आहे. त्यामुळे अनुभवाच्याही पलीकडे जाऊन चिरंतन कलात्मक गोष्टींचा शोध घेता येऊ शकतो.  त्या सगळ्यांचे एक कॉम्पोझिट नातं असतं. त्यामुळे जेव्हा माझ्या मनात एखादी कथा येते, तेव्हा त्या कथेतील वास्तू, वास्तूमधल्या वस्तू, त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या माणसांचे पोशाख हे सगळं विचार करूनच मी गोष्ट-संहिता लिहिते.
               त्याला आणखीन दुसरे उत्तर असे येईल की, कुठलीही कला पण विशेषत: चित्रपट कला, कारण; चित्रपट कला आपण अंधारात बघून आस्वाद घेत असतो.  फक्त आपण आपले असतो आणि समोर पडद्यावर जे  दिसते ते असतं.  त्यामुळे तुम्ही अधिक सजग होता आणि ती गोष्ट केवळ जाणिवेच्या पातळीवर पोहोचते असे नाही, तर खोल खोल अंतरात नेणिवेच्या पातळीवर ती कथा जाऊन पोहोचते.  त्यामुळे कथा तुमच्या लक्षात राहते. कारण तो तुमचा भावनिक अनुभव होऊन जातो.  या दृष्टीने देखील वास्तू आणि त्या संदर्भातले अन्य घटक मला महत्वाचे वाटतात.  त्यामुळे मी त्या सगळ्यांचा  विचार करते.

वेगवेगळ्या भाषा तुमच्या सिनेमात जाणवतात.  संस्कृतमध्ये  श्लोक असतात. स्तोत्र  असतात... भाषेला स्थानिक संदर्भ असतात.  भाषेमध्ये अनेक बोली असतात.  तर भाषेच्या अंगाने तुम्ही काय विचार केलेला असतो. विशेषतःध्ये अस्तुमध्ये.
- भाषेचा विचार करावाच लागतो. केला पाहिजे !  कुठलीही कलावस्तू करत असतांना विशेषत: चित्रपट करत असताना तुम्हाला त्याचा सखोल अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास असतो कथा विषयाचा, मांडणीचा आणि कंपोझिटचा ! अस्तु या चित्रपटातील प्रमुख पात्र हे संस्कृत पंडित आहेत.  ते भारतीय ओरिएंटल इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून निवृत्त झालेले आहे. मला हे पात्र संस्कृत पंडीत आहे असं दाखवायचं होतं.  त्यामुळे मला स्वतःला उपनिषदांचा अभ्यास करावा लागला. सिनेमातले काही श्लोक उपनिषदांमधले, अथर्ववेदांमधले आहेत. आणि अशा संस्कृतीच्या अभ्यासकाला स्मृतिभ्रंश झाल्यानंतर तो काय आठवत राहील... कसा आठवत राहील... काय बोलेल...  यासाठी अभ्यास महत्त्वाचा असतो. देवराई सारखा चित्रपट स्किझोफ्रेनिया या आजारावर आहे. हा चित्रपट करत असतांना अनेक आजारी व्यक्ती, मानसिक रुग्ण, यांना मी भेटले. सायकियाट्रिस्ट बरोबर चर्चा केल्या.  मेंटल हॉस्पिटलला भेटी दिल्या. प्रत्येक विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल अभ्यास गरजेचा असतो. त्यामुळे प्रतिभा, उत्स्फूर्तपणा यांच्यामागे अभ्यास असतो.

तुमच्या चित्रपटांमध्ये प्रतिमांचा वापर अनेक ठिकाणी दिसतो. जसं 'माझा भारत'मध्ये एकीकडे अण्णांचे  देशव्यापी आंदोलन चाललंय आणि  दुसरीकडे घरातली आंदोलने, दोघी चित्रपट रांगेने मुंग्या चाललेल्या आहेत आणि दोन-तीन मुंग्या विरुद्ध दिशेने येत आहेत. कासव चित्रपटाचं नाव ऐकल्यावर मनात काहीतरी येतं. ते काहीतरी म्हणजे असं - 'कासव असुरक्षित वातावरण असलं की स्वतःला आक्रसून घेतं आणि सुरक्षित वातावरणामध्ये  मनमोकळे वावरतो. कासव होणं स्थितप्रज्ञ होणं, स्थिर होणं. कासव म्हणजे, अहिंसेच्या वाटेवरून चालणं..'  प्रतिमांच्या वापराविषयी जाणून घ्यायला आवडेल. 
- प्रतिमांचा वापर मला करायला आवडतो. प्रतिमा म्हणजे, जे वाटतं ते वेगळ्या पद्धतीने मांडणं, तुम्हाला जे सांगायचंय ते वेगळ्या पद्धतीने सांगणं. अस्तु चित्रपटात स्मृतिभ्रंश झालेले संस्कृत पंडित हत्तीच्या मागे जातात. तिथे हत्ती हे प्रकारे प्रतिक आहे. हत्ती हे  बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे. हत्ती  विसरत नाही. त्याला फार लक्षात राहतं आणि हा संस्कृत पंडित हत्ती दिसल्यावर त्याला काही कळत नाही, तो हत्तीच्या मागे चालत जातो. तो पंडित स्मरणाच्या मागे हळूहळू जातोय. आणि त्या  हत्तीची देखभाल करणाऱ्या कुटुंबात त्याला संस्कृत पंडिताला त्याची आई आणि त्याचं समाधान सापडतं. मला असं वाटतं, आपली संस्कृती खूप प्रतिकांनी भरलेली आहे. त्यातून आपलं जगणं आणखीन समजायला मदत होते, ती आपली सांस्कृतिक समृद्धी आहे !

तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत ?
- माझ्या खूप अपेक्षा आहे तुमच्याकडुन. पहिली अपेक्षा म्हणजे, खरोखरच काहीतरी वेगळं करणारी मी एकटी नाही तर नेहमीच्या टिपिकल - सो कॉल्ड- करमणुकीच्या चार  चित्रपटांपेक्षा वेगळं काहीतरी करणारी लोकं आहेतच. त्यांच्या पाठीशी उभं राहा. केवळ चित्रपटच नाही तर  संगीत, नाटक, चित्र या प्रांतात देखील  काहीतरी  वेगळं काहीतरी करणाऱ्या माणसाला समाजाने आधार दिला तर त्या समाजाची स्वतःची प्रगल्भता नक्कीच वाढेल,  असं मला वाटतं.  अर्थात  तुमच्या सगळ्यांच्या आधाराची कलावंताला गरज असते. (इथे आधार हा आर्थिक, व्यवहार या अर्थाने म्हणत नाही तर या अँप्रेसिएशन अर्थाने म्हणते)  एखाद्या कलेचा आस्वाद घेतांना त्या कलेची भाषाही आस्वाद घेणाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे.  म्हणजे आपल्याला  आणखी उत्तम प्रकारे त्या कलेचा आस्वाद घेता येईल. आणि  कुठलाही समाजात ॲप्रिसिएशन मागण्याचा कलावंताला हक्क असतो. त्या अर्थाने माझा तुमच्यावर हक्क आहे, म्हणून हे मी मागते. अत्यंत प्रामाणिकपणाने टीका करायलाही हरकत नाही.  पण अत्यंत प्रामाणिकपणे त्याला प्रतिक्रिया द्या !

ईमेल- kabirbobade09@gmail.com
मो. ७३५००३९२०९ 

Comments

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com