अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

'भणंग वर्तमानाची वेदना : माझ्या हयातीचा दाखला'

'भणंग वर्तमानाची वेदना : माझ्या हयातीचा दाखला'

- कबीर उषा लक्ष्मण बोबडे
---------------------------------------------------

मी पेरतो
पेनाच्या तिफणीने
कागदाची जमीन
फुलांची माणसे
आणि माणसांची फुले व्हावीत म्हणून...
असं माणसाचं गाणं गाणारी माणूसकेंद्री कविता  कवी डॉ विशाल इंगोले यांचा "माझ्या हयातीचा दाखला" या काव्यसंग्रहात वाचली. या कविता संग्रहातील कविता मधून सर्वसामान्यांच्या जीवनातील प्रश्न मुखर होतात. कवी आजूबाजूच्या भोवतलाला आपल्या कवितेचा विषय बनवतो, त्यामुळे आपल्या समाजाचं दाहक वास्तव, प्रतिबिंब आपल्याला कवितेत दिसतं. विषणन्न जाणिवांची ही कविता समकालीन ज्वलंत प्रश्नांवर बोट ठेऊन समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित, घटकांच्या व्यथा-वेदना मांडते. पुरोगामी, विद्रोही आणि प्रबोधनात्मक विचारांची ही कविता विचारप्रवण आणि  अंतर्मुख करून काळीज ढवळून काढते. सामाजिक संदर्भ उकलून दाखवणारी ही कविता आक्रस्ताळी होत नाही, ती सुबोधपणे व्यक्त होते, मनाला भिडते. विशाल इंगोले यांचा जीवनानुभव समृद्ध असल्याने साहजिकच त्यांच्या कवितेचा   पैस व्यापक आहे. इंगोले यांची कविता थेट आजच्या सगळ्या जगण्यावर भाष्य करते.



कवी डॉ. विशाल इंगोले हे स्वतः डॉक्टर असून शिवाय विविध सामाजिक चळवळींशी त्यांची बांधिलकी आहे. त्यामुळे साहजिक त्यांची कविता समाजातील विविध सामाजिक प्रश्नांशी भिडते. याबाबत ते म्हणतात , ‘ आजूबाजूचे वातावरण ,माणसं ,समाज ,जिवंत प्रश्न ,मेलेली उत्तरे अशाच डोक्याभोवती अविरत मधमाश्यासारख्या भनभननार्या गोष्टीनी कवितेची सुरूवात झाली आणि अजूनही माझी कविता आजच्या याच  मुर्दाड वर्तमानाचे जिवंत चित्रण करत मोठी होते. माझ्या अन कवितेच्या हातात तीच मशाल आहे आणि तिला हाच काळवंडलेला वर्तमान उजेडात आणायचा आहे... ’  कवितेबाबत इतकी रोखठोक आणि ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे. सुस्पष्ट भुमिका कवीने घेतल्यामुळे त्यांची वंचितांच्या वेदनेला वाचा फोडून माणसाच्या जगण्याचा धांडोळा घेते. यशवंत मनोहर म्हणतात तसं, "माणसं संभ्रमित झाली तर एक वेळ समजून घेता येईल ,पण कवींन संभ्रमित होण्याची कोणतीही सोय कवी या शब्दात नाही. माणसं विझली तर तेही एकवेळ समजूुन घेता येईल, पण कवीचं विझण कवी या शब्दालाच मान्य नाही माणसं बेजबाबदार झाली तर एकवेळ समजून घेता येईल पण कवी या शब्दाच्या अर्थामध्ये कोणताही बेजबाबदार पणा बसत नाही. त्यानं असत्याच्या विरोधात आणि सत्याच्या बाजूनं सतत बोलत राहिल पाहिजे. कवीचं हेच जन्मप्रयोजन आहे"  वा  साहित्यिकांनी सामाजिक दृष्टिकोनातून बदलत्या समाजजीवनाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, असा  पवित्रा काही समीक्षकांनी घेतल्यामुळे इंगोले यांच्या कवितेत देखील सामाजिकतेचे प्रतिबिंब  उमटले. वास्तवाची जाणीव, आसपासच्या घटनांचे भान आणि लेखन परंपरेचे अधिष्ठान त्यांच्या लेखनातून ठळक होते. काळजातली तळमळ व्यक्त करण्याची तडफड , विचारातील स्पष्टता, विचाराच्या कक्षा, त्या विचाराशी असलेली बांधिलकी, भवताल समजून घेण्याची दृष्टी यामुळे ही कविता अधिक दर्जेदार वाटते. आजच्या उत्तराधुनिक काळात, जागतिकीकरणाच्या काळातही परंपरागत छळवणूक आणि व्यवस्थेकडून खुल्या दिलाने स्वीकारले न जाणे ही गोष्ट कवीला कमालीची अस्वस्थ करते आणि याच घालमेलीच्या जाणीवेतून आणि भोवतालाच्या सामाजिक भानातून विशाल इंगोले यांची कविता जन्म घेते. वर्तमान जगण्यातले ताणेबाणे हा समकालीन कवितेचा ताजा स्वर राहत आलेला आहे. नंग्या वास्तवाची हिशोब ही कविता मांडते. या कविता संग्रहातील कविता समकालीन म्हणून जेवढी महत्वाची आहे, तितकीच भाषा आणि आशय या दृष्टीनेही ही कविता तेढ्याच उंचीची आहे.

कविता, गझल, अभंग आदी काव्यप्रकार कवी हाताळणारी  इंगोले यांची कविता उसवत चाललेली समाजाची नेमकी वीण पकडते. चळवळींची भरकटलेली दिशा आणि त्यामुळे त्यांची झालेली दशा, तसेच गाव आणि शहर यामधील सूक्ष्म फरक दाखवते. त्यांची कविता ही केवळ प्रश्न उपस्थित करून थांबत नाही तर त्या प्रश्नावर उत्तरही आपसूकच देते. त्यामुळेच विशाल इंगोले यांची कविता आश्वासक वाटते. त्यांची  कविता केवळ उद्वेग व्यक्त करत नाही तर परिवर्तनाचा आग्रह धरताना देखील एक आशावाद व्यक्त करतो. उजाड झालेली शेती व्यवस्था, धर्म व्यवस्था, शिक्षण व्यवस्थेतील वास्तव,  राजकारण, न्याय व्यवस्था, गरिबीच्या ओझ्याखाली भरडून जाणारे सामान्य, प्रसारमाध्यमे, अन्याय, अत्याचार, अस्मानी संकट, गुलामी, वेठबिगारी, बदलत्या काळाचे, गावाचे संदर्भ यावर एका वेगळ्या परीभाषेतून ही कविता बोलत राहते. इंगोले यांच्या कवितेतील सामाजिक चिंतन अत्यंत तात्विक आणि गंभीर स्वरूपाचे आहे. मानवी मनोवस्थांची कहाणी, दु:ख, तुटलेपण, परकेपण, असहायता, भवतालची अस्थिरता, माणसाचं कारुण्य या सर्वांना लाभलेली आत्मचिंतनाची जोड यातून वेगळ्या जाणीव-नेणीवेची इंगोले यांची कविता बहुप्रतीक्षेत असली तरी समकालीन मराठी कवितेत आपला वेगळा ठसा उमटवणारी कविता आहे. ही कविता बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा कोलाज असल्यामुळे या कवितेतील सामाजिक संवेदन प्रभावी वाटते.

'आपण एवढे करूया' या कवितेेत कवी म्हणतो-
मी घेतल्या पिढ्या उकरायला
आणि सुरू झाले
उत्खनन ...
थराखाली थर उकरत जाताना
सापडले संस्कृतीचे वेगवेगळे पदर
मडकी, भांडे नाल्या
घरांचे आणी नगराचे अवशेष
आणि सुरू झाली अंदाज
बांधणी जगण्याची, संस्कृतीची...

येणाऱ्या पिढ्यांनी
उत्खनन केल्यास
त्यांना सापडेल का..?
शस्त्रविना एखादा थर
हातात हात आणि गळ्यात गळे
असलेले सांगाडे.... ( आपण एवढे करूया / पृष्ठ ९)

उत्खनन केल्यावर संस्कृतीचा अभ्यास केल्या जातो. भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी उत्खनन केल्यास त्यांना आपले कुठले अवयव गवसतील माहिती नाही. मात्र, अनेक शतका नंतर उत्खनना नंतर आपले प्रेमाचे दुवे, एकमेकांच्या हातात एकमेकांचे हात, एकमेकांच्या गळ्यात एकमेकांचे गळे असलेले सांगाडे आपल्या पिढ्याना सापडतील का, हा प्रश्न कवीला पडतो. आणि त्यासाठी आपण काहीतरी करावं, अशी इच्छा बाळगतो.

'भाड्याची खोली' ही कविता अनेक अर्थानी वाचकाला उलगडत जाते. भाडयाच्या घरापासुन देहाच्या घरापर्यंत ते थेट अगदी सरोगेसी मदर या गर्भाच्या खोलीच्या भाडयापर्यंत वाचकाला या कवितेचे पदर उसवत नेतात. या कवितेत कवी म्हणतो-

माझं अस्तित्व सांभाळणाऱ्या
घराला भाड्याची खोली
म्हणणं कधी जमलंच नाही

ओरबाडणाऱ्या कितीतरी नखांना
याच भिंतींनी रोखून धरले
कुशीत घेऊन दिले बळ
जेंव्हा जेंव्हा रान पेटले

काल घर खाली करतांना
गवसलेच नाही हक्काच्या
खूंटीवरचे अश्रू लगाम...
मिटताच आले नाही
ओथंबल्या भावनांचे दार
उतरवताच आला नाही माथ्यावरून
उपकार क्षणांचा भार...

घरातून एक एक वस्तू
काढतांना
आयुष्यच ओके बोके होत गेले
सुवासीनीचा एक एक
दागिना उतरवल्यासारखा
अन मी हतबलतेच्या किनाऱ्यावर
आईला पारख्या लेकरासारखा

घर असते
लाज राखणाऱ्या
द्रोपदीला दिलेल्या
कृष्ण वस्त्रासारखे...
आयुष्य लढाईत
शस्त्र पराजेपर्यंत
लपण्या सारखे...
गच्च भरल्या
भूगोलाच्या पसाऱ्यात
तुमचे अस्तित्व
सांगण्या सारखे...

दिले सोसण्याचे बळ
लपविले जखमांचे वळ...
दिली मायेची कुशी
जेंव्हा जेंव्हा लागलो कण्हू
त्या माय कुशीला
भाड्याची खोली कशी म्हणू ...
भाड्याची खोली कशी म्हणू … (भाड्याची खोली / ४१)

ही कविता भाड्याच्या खोलीचा संदर्भ घेऊन येत असली तरीही अनेक अर्थाने माणसाच्या आयुष्याभोवती फिरत राहते.
भाड्याच्या खोलीशी असलेले ऋणानुबंध कुठलं नातं नाही म्हणून कसे नाकारायचे? हा प्रश्न कविला पडतो आहे. नव्हे, कवी वाचकांना हा प्रश्न वाचकांना विचारून अंतर्मुख करतो. भाड्याच्या खोलीशी जोडलेली नाळ, भावनिक गुंतवणूक, भावनिक अतुटता, भावनिक  जिव्हाळा,ओलावा कुठलच नाव त्या नात्याला नसतांना देखील  अगदी तेवढ़याच तरलतेने "भाड्याची खोली" हे प्रतिक वापरून कवी वाचकांच्या हृदयात वसणाऱ्या अश्या बंधांना स्पर्श  करून दर्शवितात.
बऱ्याचदा अश्या अनामिक भावबंधनांना जीवनाच्या वाटेवर कुठल्याही वळणावर काळजावर दगड ठेऊन अलगद सोडून समोर चालत जावे लागते कारण रूढ नात्याच्या वा समाजाच्या नैतिकतेच्या  कुठल्याच व्याखेत ते बसत नाही. तेव्हाची होणारी तगमग कवी अनेक प्रतिकांमधुन अतिशय भावपूर्ण व्यक्त करतो.
कवी अश्या या भाडयाच्या खोलीला म्हणजेच अनामिक नात्यांना जे त्याला घराची ऊब देते ती अगदी मायेच्या कुशीसारखी वाटते.आणि म्हणूनच कवी म्हणतो ही मायेची कुस, ऊब याला भाड्याची कशी म्हणु?  अनेक अशा गोष्टी असतात ज्याचा आपल्या जिवनाशी दुर दुर पर्यंत संबंध नसतो तरीही त्या आयुष्याचा आधार होतात. आपलं जगणं तोलून धरतात. आपल्याला मायेची ऊब देतात,  मग भलेही ती काळजाची नाती असतील वा व्यावहारिक दुनियेतील नाते संबंध असतील, जिवनाला सहायक ठरणाऱ्या, जगण्याला ऊर्जा देणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी ही  कविता अगदी तंतोतंत लागू पडते.

'ओझं' ही कविता तिच्यातील मन पिळवटून टाकणाऱ्या आशयामुळे अत्यंत वेधक ठरते .कवीकडे एक पेशंट येतो. दम्यानं पोखरलेला. तर डॉक्टर म्हणतो, मोठ्या दवाखान्यात जावं लागेल. त्यावर तो पेशंट डॉक्टरला  म्हणतो -

डॉक्टर,
फ़क्त चार महिने चालवा
माझी इंधन संपलेली गाडी
बोहल्यावर चढलेली बघू द्या
अंगाखांद्यावर वाढलेली फ़ुलझडी

 शेवटी काकुळती येऊन तो डॉक्टरला  विनवतो-

फक्त
गोळ्या आणायला गेलेल्या
बछडीला काही सांगू नका
तिच्या मनाच्या वसंताला
शिशिराची ओळखच दावू नका....(ओझं / २६)

वाचकाच्या अस्वस्थ करणाऱ्या अशा डॉक्टरी अनुभवांवरच्या आणखी काही कविता या संग्रहात आहेत. गाव खेड्यातील  सामान्य - अशिक्षित माणसांचं जगणं मांडणारी ही कविता वाचकांच्या जगण्याचा परिघ वाढवून त्यांना वेगळी अनुभूती देतो.

त्या पिंपळवृक्षाखालचे
अतिक्रमण काढावे म्हणतो,
माणसाला आणि बुद्धाला
थेट जोडावे म्हणतो..!! (अतिक्रमण/ पृष्ठ १४)

असे सरळ सरळ आणि स्पष्ट सांगणारा कवी. आपल्या ओळी मानवतेच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवतो. बुद्धाला आणि माणसाला थेट जोडण्याची भाषा करणारी ही कविता असून ती काळाची गरजही आहे.

' चळवळ'ही मार्मिक कविताही सद्यपरिस्थितील परिवर्तन चळवळीचा पोकळपणा दाखवणारी
चळवळीचं खोखलेपण, पोकळपण उजागर करते. कवी म्हणतो-

 ‘रात्री ….
पेल्यात बुडालेला बुद्ध
चखण्यात खारटलेला तुकाराम
सोड्याच्या बुडबुड्यात
तरंगणारा फ़ुले
मिनरल वॉटरच्या
थंडगार पाण्यात
निपचित पडलेला  छत्रपती
अन ..ब्रॅंडमध्ये वाटलेला आंबेडकर.... (चळवळ / पृष्ठ ४५)

'निराधार' या कवितेतून कवीने शासनाच्या अनेक योजनांच्या फोलपणावर अचूकपणे बोट ठेवले. आपल्या प्रत्येकालाच शासकीय यंत्रनेमधील चिरीमिरीचा अनुभव आलेला असतो. चिरीमिरी दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक खुर्चीखालून  टाळूवरचे लोणी देखील कमी करत नाहीत. निराधार लोकांना शासन महिन्याकाठी तुटपुंजी आर्थिक मदत करते. मात्र, ती रक्कम देखील शासकीय कार्यालयातील बाबू- कारकून लोक पळवतात.  तेव्हा लाभार्थीने कारकून - बाबूला केलेल्या विनवण्या ह्या  काळीज  पिळवटून टाकतात.

साहेब एवढा वेळ
पगार काटू नका
थुकलेला थुका
पुन्हा असा चाटू नका
जगण्याच्या तिरडीला
नका देऊ खांदा ,पण
दुसर्याच्या उपकाराची
सरणाची लाकडे तरी काढू नका’ (निराधार / पृष्ठ २१)     

कुठल्या कुठल्या कल्याणकारी योजना सरकार जाहीर करते , पण लाभार्थींपर्यंत ती मदत पोहोचतच नाही, याचा आपण सारेजण वेळोवेळो प्रत्यय घेत असतो. देशाच्या राजकीय व्यवस्थेचा आणि भ्रष्ट नोकरशाहीचा भ्रष्ट्राचार करणे स्वभाव आहे हे आपण ओळखून आहोत. वृद्धांना, अपंगांना,  निराधारांना या लाभार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत खूपच तुटपुंजी असते. तुटपुंजी म्हणजे किती ? तर कवी म्हणतो- 'सुईच्या भोकाएवढि !'

मिळतो दोन तीन महिन्याला
निराधार म्हणून …
सुईच्या भोकायेवढा पगार
घुसतच नाही त्यातून
अडचणीचा धागा आर पार
अन परिस्थितीला झालेला
मोतीबिंदूचा आजार …

कर्ता लेक नेला त्यानं
अन, ठेवले झिजल्या हाडांचे पिंजरे
साहेब …
तुम्ही तरी असं करू नका
म्हातारा म्हातारीचा राग धरू नका …
एवढ्या बारीन द्या साहेब
साम्दाच्या समदा पगार
पावसाळ्याच्या तोंडावर
झोपडीचा भुगा झालाय पार..
दारापुढली बकरी बी
केली कोन्हं पसार...

साहेब येव्हड्या वेळ पगार काटू नका
थुकलेल थुका पुन्हा असा चाटू नका
खचलेल्या भिंतीची माती अशी काढू नका
जगण्याच्या तिरडीला
नका देऊ खांदा…. पण
दुसऱ्याच्या उपकाराची
सरणाची लाकडे तरी काढू नका  (निराधार/ पृष्ठ२१)

डॉक्टर
दुखण्या, इलाजाचे राहू द्या
तेवढे अपेक्षा मारण्याचे इंजेक्शन
आणि भावना ,संवेदनाना मारणारे
एखादे सलाईन देता का…?
मरणाच्या बाजारातले
हे जगणे
विकत घेता का ?(ठसठसती जखम -94 ) .
या कवितेत काळीज पिळवटून टाकणारी एका स्त्रीची व्यथा कवीने मांडली. कवितेतील स्त्री तीन महिन्यांची असतांना तिची माय मेली आणि बापानं दुसरं लग्न केलं. सावत्र आईच्या सावलीत हेळसांड झाली. नऊ वर्षाची असतांना विटेचं टोपले घेऊन तिसऱ्या माळ्यावरून पडल्याने मणके मोडले.. आता बापही मेला. आपलं म्हणावं, असं कुणी उरलं नाही.... म्हणून मग डॉक्टरला संवेदना मारणारे सलाईन देता का? असं म्हणणाऱ्या स्त्रीचा सवाल सुन्न करणारा आहे.  स्त्री जाणिवा रेखाटताना कवी कमालीचा हळवा होतो. आपल्या 'तू आहेस म्हणून' या कवितेतील ही ओळ बघा-
"तू आहेस,
नुसत्या कल्पनेने..
आत्महत्येच्या दारात
उतरते जगण्याची रांगोळी
फुलून येतो...
उन्हाच्या नाकावर टिच्चून
जगण्याचा पळस...
साऱ्या घराला प्राणवायू
देणारी तू तुळस... (तू आहेस म्हणून / पृष्ठ १०८)
कवीच्या जगण्याचा आधार असलेली ती कवीला प्राणवायू देणाऱ्या तुळसीसारखी वाटते. तुळस किती सुंदर प्रतिमा ! विलक्षण प्रतिभेचा धनी असलेल्या या कवीची कविता वाचकाला संवेदनशील बनवते.

'एच. आय. व्ही. सोबत जगताना' या कवितेत कवी म्हणतो -
'दुरावत गेली
आपली आपली वाटणारी माणसं सगळेच नात्यातून ती
वेगळी झाली
जशी खुडावी कणसं..
आता...
चिमुकल्या फुलासाठी
जमेल तशी ती भांडते आहे.. (एच. आय. व्ही. सोबत जगतांना/ पृष्ठ ९७)
कवी डॉक्टर असल्याने त्यांचा भिन्न स्तरीय लोकांशी संपर्क येतो. या कवितेत देखील एका अबला डॉक्टरकडे दवाखान्यात येते आणि ती निघून गेल्यावर लोक डॉक्टरला सांगतात, तिला एड्स आहे, सांभाळून राहा, धंद्यावर परिणाम होईल... या कवितेत कवी केवळ अबलेची व्यथा मांडत नाही तर एड्सग्रस्त स्त्रीच्या जगण्याला खांदा देण्याची वेळ आल्यावर पुरुषी मानसिकता कशी असते हे भेदकपणे मांडले आहे.

स्वातंत्र्याचा उत्सवात
लोकशाहीच्या पत्रावळीवर
संविधानाचे..
सारे मेनू नक्की झाले
मेनू ठरवणा-यांचा उत्सव
भरात आला आहे
मेनू बनविणा-यापर्यंत
अजून पत्रावळी पोहचली नाही
एवढेच.... (लोकशाही/ पृष्ठ २५ )

देश स्वतंत्र होऊन सत्तरी ओलांडली. मात्र, अजूनही एक मोठा उपेक्षित घटक लोकशाहीपासून वंचित असून अजूनही तो समाज घटक गुलामीचीचं जगणं जगत आहे.  एका छोट्या कवितेत कवीने लोकशाहीची कशी वाट लागली, ते अधोरेखित केले.

आईच्या उपकाराची भावना फेडतांना आपल्या हाती असणारी शुन्यता कवी 'दोन श्वास' या कवितेत  व्यक्त करतो-
मी मात्र असा अभागी
नाही देऊ शकलो
दोन श्वासही...
तुझ्या असंख्य श्वासांच्या बदल्यात
तुझे श्वास मंदावताना (दोन श्वास / पृष्ठ १७)
आई आपल्याला लहानच मोठं करते. नऊ महिने पोटात वाढवते. स्वतःच्या जीवापेक्षाही आपल्या लेकरांच्या जीवाला सात काळजाच्या आत जपत असते. आणि या कवितेत कवी आई बद्दल लिहितांना म्हणतात, तिचे श्वास मंदावताना तिच्या असंख्य श्वासांच्या बदल्यात आपले दोन श्वासही देऊ शकलो नाही असे अभागीपण प्रत्येक मुलामध्ये दिसत असल्याचे सूतोवाच ही कविता करते.

धर्माचा स्थापना मानवी कल्याणासाठी झाली. माणसाला माणूस जोडण्यासाठी झाली.. जगात शांतता प्रस्थापित व्हावी, म्हणून झाली. मात्र मुळ संकल्पना बाजूला सारून ती फक्त अस्मितेची बाब बनून राहिली आहे. आणि या चढाओढीत माणूस होरपळून निघत आहे. धर्मानी माणसांचा जेवढा संहार झाला, तेवढा अन्य कशानेही झाला नसेल! यावर थेट मार्मिक भाष्य करताना कवी म्हणतो-

हे कोणते धर्म पाळतो आम्ही
चौकात माणसे जाळतो आम्ही !
( हे कोणते धर्म / पृष्ठ ६९)

भारत हा खेड्यांचा देश आहे. जवळपास ७० टक्के लोक अजूनही खेड्यात राहतात. महात्मा गांधींनी देखील खेड्याकडे चला असा संदेश दिला होता. मात्र, खाऊजा धोरणामुळे आज देशातील खेडी मरणासन्न अवस्थेत पोहीचली. खेड्यात ना आता पूर्वी सारखं निखळ जगणं राहील, ना सुखाने मरण देखील नाही मिळत. विकासा सोबतच अनेक दृष्टीने खेडी कायम दुर्लक्षितच राहिली. गावावर कुणाची नजर जातच नाही.  गावगाड्यांचा बदलता नूर, मातीच्या आणि माणसांच्या जखमा, बदलते संदर्भ हे सगळं इंगोले यांच्या त्यांच्या कवितेत येतं.  गावाची शुद्धता, खळे, माणुसकीची सावली, निर्धोक बालपण, गल्लीबोळ, सलोखा हे सगळं आता हद्दपार होत आहे हे सांगताना कवी म्हणतो-
"आताआताशा
 गाव रंगीबेरंगी झालंय
 छतावर आपापले झेंडे टांगून
 चालणे सोडून, गुडघ्यावर रांगून.." असे कवी निरीक्षण नोंदवतात. आणि हे निरीक्षण कुठल्याही संवेदनशील वाचकाला अस्वस्थ करायला लावते.. या नोंदीतून - निरीक्षणातून उद्याचा संहाराकडे अंगुलीनिर्देश करायचा आहे, असं वाटतं. तर जागतिकीकरण आणि अति आधुनिकीकरणाने तंत्रयंत्रयुगाने निर्माण केलेले प्रश्न हे  गाव आणि शहर या कवितेत  ते व्यक्त करतात.

"जगाचे खेडे करणाऱ्या
जाळ्याला
खेड्याचं जग दिसत नाही
अजूनही..."
असे सांगून गावं शहरी झाल्याचे मान्य करुनही खेडे व शहर यांच्यातले अंतर न वाढता माणसं माणसं जोडणारा पूल फक्त उभा रहावा, अशी मानवतेची भूमिका या कवितेत कवीने घेतली.  कवितेतून फुलांची माणसे आणि माणसांची फुले व्हावी, परंपरेच्या जमिनीत परिवर्तनाची बीजे यावी यासाठी विशाल इंगोले यांचे कविता आग्रही दिसते.

हाडाच्या शेतकऱ्याने ही कविता
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारी महत्त्वपूर्ण कविता आहे. शासन यंत्रणेवरील मार्मिम टिपण्णी असलेली ही कविता एसी मधला सायेब त्याला शेतकऱ्यापेक्षा शेतीतील जास्त कळतं, या आविर्भावात साहेब  वापरतो. कवी लिहितो-
हाडांच्या शेतकऱ्याने काही बोलायचे नसते
कारण ए सी तल्या साहेबाइतके त्याला काही कळत नसते ! (हाडाच्या शेतकऱ्याने/ पृष्ठ ३४)

या कविता संग्रहातील कविता ही प्रस्थापित व्यवस्थेकडून नाकारल्या गेलेल्या नाही रे वर्गाचा प्रातिनिधिक आवाज आहे. शासन व्यवस्था नाही रे वर्गाचे शोषण करत असेल तर ही कविता स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता याची चाड ठेऊन सामान्यांचा आवाज बुलंद करते. सामाजिक - शैक्षणीक- राजकीय क्षेत्रात असलेल्या व्यवस्थेतील फोलपणा दाखवून आपल्या कविता मधून ओरखडे ओढले आहेत. कष्टकरी, गुलाम, शेतकरी हे कवीच्या चिंतनाचे आणि काळजीचे विषय आहेत. या कवितेतून माणसाचं जगणं, जगण्याचा आशय, भोवतालचे प्रश्न हे सगळं सूक्ष्म निरीक्षणासह मांडलं आहे.

धर्म नावाच्या कवितेत कवी म्हणतो-
काल उगाच मला
शेजा-यानं हटकलं
म्हणाला..
पुरोगामी पुरोगामी म्हणवून
नास्तिक झालात
धर्म बुडवला म्हणून हे भोग वाट्याला आले
अन् फुलांचे घर काट्याचे झाले
मला..
हयातभर गळ्यात देव गुंतवून
देवळाच्या दारात उपाशी मेलेला
विठ्या भिकारी आठवला
त्यानं, कोणता धर्म होता बाटवला ?

या चिंतनशील कवितेतील अनुत्तरीत प्रश्न डोक्याला झिणझिण्या आणतो.

जग झपाट्याने बदलत आहे. नागर संस्कृतीत लहानाचे मोठे झालेले लोकांना, नोकरदार वर्गाला कायम वाटतं की, शेती वाचून त्यांचं काही अडत नाही. मात्र, उभ्या जगाला तिच काळी भुई पोसते. आणि म्हणून गावाविषयी- शेतीविषयी- मातीविषयी असलेली आस्थेतून कवी सांगतो-
जगाचे अन् जगण्याचे
कितीही बदलले संदर्भ
तरी होणार नाही
कोणत्याच काळी
जगण्याच्या गणितातून
माती वजा...
ती आहे म्हणून
जीव आहे राजा! (माती आहे म्हणून / पृष्ठ ८३)

किती सहज असलेली ही कविता आपली मातीपासून तुटत गेलेली नाळ परत मातीशी जोडते.

आपण एवढे करूया, कविता, अतिक्रमण, दोन श्वास, निराधार, हाडाच्या शेतकऱ्याने, कविता आणि ती, कविता जगणे, माती आहे म्हणून, गाव आणि शहर या अशा अनेक ओळींमधून हा कवी वाचकांना अक्षरश: ओरबडून काढतो. तर मार्कापुरते फक्त, एल्गार, लोकशाही या कवितेतून चळवळ- राजकारण कसं दांभिक होत गेलं याचं चित्र अधोरेखित केले.  एकूण या कविता संग्रहातील कवितामध्ये समाजाविषयीचे  सखोल चिंतन केले आहे. संबंध कवितेतून सर्वत्र प्रतिकुलता दिसते.

सहजता कविच्या काव्यात काव्यातुन प्रकटते.
भोवतालच्या तीव्र दुखाशी, तीव्र वेदनेशी एकरूप होऊन इंगोले यांनी संग्रहातल्या कवितांना शब्दरूप दिले आहे.  ज्वलंत प्रश्नाना भिडून त्यावर त्यांनी अत्यंत सरळ भाषेत प्रहार करतो.

विशाल इंगोले यांची कविता जात, पात, धर्म, शहरीकरण, भांडवलशाही,अव्यवस्था,अमानवीकरण यांच्या दु:काळात नि रंगांच्या दुनियेत  स्वत:ला खरवडून घेत फक्त माणसाचा झेंडा  बरोबर घेऊन मनामनांत पोहचत राहते.  मानवतेचा झेंडा घेऊन निघालेली माझ्या हयातीचा दाखला मधील कविता  माणसाचा नव्याने  शोध घेण्यास भाग पाडेल यात शंका नाही .

वाचकाच्या मनाचा तळ ढवळून काढण्याची विलक्षण ताकद या कवितेत आहे. या कवितेतील एक न एक शब्द मानवकल्याणाची आस बाळगून आहे. कविचा विद्रोही बाणा संत कबीर, संत तुकाराम महाराजांच्या विद्रोहाशी नातं सांगणारा आहे. समष्टीची वेदना मांडत असताना आपले दुःख बाजूला ठेवून देतो आणि  मध्यम वर्गीयांची कुचंबणा, शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा, शेतकऱ्यांचं अभावग्रस्त जगणं, स्त्रियांचे होणारे शोषण, धर्मांध प्रवृत्तीचे बळी असे अनेक विषय कवितेत मांडतो. माणसाचं जगणं सुंदर व्हावं या साठी तो विचारपेरणी करीत जातो.

माणसाचा, मानवतेचा झेंडा घेऊन निघालेल्या या कवितेचा झेंडा कायम फडकत राहील यात शंका नाही. कविता संग्रहात जास्तीत जास्त कविता मुक्तछंदात आहेत मात्र त्यांनाही एक लय आहे.. परिश्रम घेऊन कमावलेली भाषा, विचारांचा दाब वाढत जमवलेला आशय, अवगत केलेली शैली, सौंदर्यपूर्ण प्रतिकांची केलेली निर्मिती, मुक्त छंदात असूनही असलेली गेयता ही या कवितेची जमेची बाजू !

या  कविता संग्रहातील प्रतिमा , प्रतिके पाहता कविच्या आफाट प्रतिभा शक्तीची कल्पना येते.
या कविता संग्रहातील वैभव मोहिनी घालणारे आहे. यादृष्टीने काही दाखले द्यायचा मोह होतो. जसे की, 'तडफडत फिरते आहे जंगल अश्वस्थामासारखे' (कविता : तहान), कागदाच्या देहावर टेकवून द्यावं मस्तक (कविता : मुखवटा), सृजनाच्या शुक्राणूला नाकारू नये गर्भाशयाच्या व्यवस्थेने (कविता : ही जग बुडण्याची गोष्ट आहे), विस्कटल्या आयुष्य पाखरावर बरोबर बसतं आश्वासन जाळे ( कविता : गुलामीची वेस) ह्या अशा अगणित प्रतिमा कवितेला वेगळी उंची  व खोली प्राप्त करून देतातच शिवाय, वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतात. प्रतिभा हा कविच्या अंगी असलेला एक पैलू किती गहन विचार करतो हे त्याच्या कवितेच्या मांडणीवरून कळते. शिवाय, महत्वाची बाब अशी की, कवीभान आणि काव्यभान यांच्याशी असलेलं प्रतिमांचं एकसंघत्व अतिशय घट्ट - अतूट आहे.

विशाल इंगोले यांची  कविता कोणत्याही वाङ्मयीन प्रवाहात वा वादात बसवता येत नाही. तिला या सर्व आधीच्या आणि समकालीन प्रवाहांचं भान आहे. परंतु त्यांच्या कवितेची मुख्य प्रेरणा ही त्यांच्या स्वानुभवातून आणि अस्वस्थतेतून आलेली आहे.

माझ्या हयातीचा दाखला ' या संग्रहाच बाह्यरूप जेवढं सुंदर आहे. तेवढंच अंतरंग सुद्धा. जे आतील उच्च दर्जाच्या कवितांनी समृद्ध आहे. कवितेचा प्रवास स्वायत्त, स्वयंप्रकाशी आहे. कवितेला आपला श्वास माननाऱ्या संवेदनशील, प्रतिभावंत कवी विशाल इंगोले यांच्या 'माझ्या हयातीचा दाखला' या संग्रहाने साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. एकूणच पुस्तक बांधणी उत्तमच. मुखपृष्ठ अप्रतिम. आतील मोजकीच असलेली चित्रे अत्यंत सुबक.  एकूणात ही कविता सर्वस्पर्शी आहे .तिचा आयाम व्यापक आहे .याचे कारण कवीचे अनुभवविश्व  विविधांगी आणि म्हणून  समृद्ध आहे . मराठी साहित्याप्रमाणेच कवितेचे ही ग्रामीण, आदिवासी, दलित, स्त्रीवादी असे प्रवाह आढळतात. डॉ. विशाल इंगोले यांच्या कवितेला कोणत्याही एका प्रवाहामध्ये बांधता येणार नाही कारण त्यांच्या कवितांचे विषय हे विविध प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारे आहे.                                                 
------------------------------------
■ माझ्या हयातीचा दाखला - विशाल इंगोले
■ प्रकाशन : काव्याग्रह प्रकाशन, वाशिम
■ मुखपृष्ठ मांडणी : प्रदीप खेतमर
■ ब्लर्ब : प्राचार्य डॉ.गजानन जाधव
■ पृष्ठे : १२८ | मूल्य : १४०
■ प्रकाशक : विष्णू जोशी 

Comments

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com