अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

नाइन्टीन नाइन्टी : कलंदर माणसाचं जगणं !




    सचिन कुंडलकर या प्रतिभावान दिग्दर्शकाचं 'नाइनटीन नाईन्टी' हे पुस्तक वाचलं. प्रस्तावनेऐवजी  ‘नाइन्टीन नाइन्टी’ याच नावाच्या दीर्घ लेखाने या पुस्तकाची सुरुवात होते. या ठिकाणी कुंडलकर लिहितात की  ‘प्रत्येक माणूस हा एका दशकाने घडवला जातो, ओळखला जातो’. कुंडलकर यांच्यासाठी हे काम १९९०च्या दशकाने केलं. मात्र, हे पुस्तक म्हणजे केवळ गतकाळाचे दस्तऐवजीकरण नाही. तर एक सृजनशील कलावंतांच्या विविधांगी जगण्याचं आणि आगळ्या वेगळ्या जीवनाचं एक मनोज्ञ दर्शन आहे. अष्टपैलू गुण असलेला हा माणूस मनसोक्त जगला, चित्रपटात रमला, नाटकात रंगला, साहित्यात वावरला, कधी कधी जग फिरला... आणि याच नव्वदच्या दशकाने सचिन कुंडलकर यांना सिनेमाशी जोडलं, पुण्याची वेस ओलांडून परदेशात नेलं.... तिथे नवीन भाषा शिकले ज्याद्वारे त्यांचं जगणं अधिकाधिक समृद्ध होत गेलं. परदेश फिरल्याने नवीन संस्कृतीशी - तिथल्या माणसांशी त्यांचा जवळून संबंध आल्याने आपलं जग आणि अवकाश किती छोटेखानी, मर्यादित  आणि संकुचित स्वरूपाचे आहे याची त्यांना जाणीव झाली. या जाणीवेने त्यांना एक मनस्वी कलावंत आणि एक संवेदनशील माणूस म्हणून अधिक समृद्ध होण्यास प्रवृत्त केलं. बाहेर किती मोठ अवकाश आहे, याची जाणीव झाल्यावर लेखक कितीतरी नवनवीन गोष्टी आत्मसात करू पाहतो. ‘नाइन्टीन नाइन्टी’मधील २१ लेख हे वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांत निरनिराळ्या व्यक्ती, स्थळं आणि गोष्टींनी कशा प्रकारे अधिक समृद्ध बनवलं याची टिपणं आहेत.  कुंडलकर यांनी जगणं टिपण कागद होऊन टिपले. त्यामुळे हे पुस्तक रूढार्थाने आपण नेहमी अनुभवलेल्या पारंपरिक आत्मकथनापेक्षा वेगळं असून त्याला आत्मकथन म्हणता येणार नाही, तर त्या केवळ जगण्याच्या नोंदी आहेत. ९० च्या दशकाचा कुंडलकर यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असल्यानेच पुस्तकाला 'नाइन्टीन नाइन्टी' हे नाव दिलं असावं, असं वाटतं.  ह्या पुस्तकातील नोंदी पूर्व परंपरेला पचवून थेट नकार देत अवतरातात. त्यांच्यावर भाष्य करतात. नाइंटिन नाईन्टी हे केवळ पुस्तक नसून, सचिन कुंडलकर ह्याच्या आयुष्याचा एक विलक्षण असा आढावा आहे. लेखकाच्या जगण्यातील आत्मनुभवाच्या कथनातून आणि जगण्यावर केलेल्या कधी मिश्किल तर कधी गांभीर्यपूर्वक भाष्यातून हे पुस्तक उलगडत जातं.
    ‘नाइन्टीन नाइन्टी’मधील जवळपास सगळंच लिखाण हे एका प्रचंड वैयक्तिक, आत्ममग्न अवकाशातून - अनुभवातुन आलेलं असून एखाद्या कथेच्या अंतरंगात शिरून त्या कथेचे पापुद्रे हलके-हलके कसे उलगडावेत, तसं स्वतःचं जगणं,  जीवनजाणीवा, आत्मगत संघर्षाचे, मानसिक संघर्ष,  घरच्या आणि भवतालच्या वातावरणातून निर्माण झालेली विवक्षित परिस्थिती सचिन कुंडलकरने मांडली.. स्वतःच्या जगण्याचा धांडोळा घेतला. केवळ घटनाप्रधानच नव्हे तर सामाजिक आणि वैचारिक अशा दुहेरी अर्थाने ‘नाइंटिन नाइंटि' एका संवेदनशीलतेच्या आत्माविष्कार आहे. आपण स्वतःविषयी बोलतो वा लिहितो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात - आपल्या अवती भवती जी माणसे आहेत, त्यांच्या विषयी बोलायला लागतो. खरंतर आपण स्वतःविषयी बोलतच नसतो. आपण इतरांविषयी बोलत असतो. आणि ते भलं- बुरं असं दोन्ही स्वरूपाचं असतं. त्यामुळे  हे पुस्तक सचिन कुंडलकर या लेखक-दिग्दर्शकाविषयी जितकं आहे, तितकंच त्यांच्या परिघातील माणसाविषयी, अवती भवतीच्या सभोवतालाविषयी आणि एकूणच  त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाविषयी आहे. या खूप सकस, नव्या आणि उमद्या लेखनाने मराठी साहित्याची, मराठी वाचकांची  इयत्ता वाढवली. स्वतःविषयीच्या सूक्ष्म निरीक्षणातून व सखोल चिंतनातून सामाजिक, राजकीय, चित्रपट, कला, साहित्य, लैंगिक, प्रेम अशा विविध भूमिकेतील जगणं लेखकाने अलगद चिमटीत पकडलं. उत्कट जीवनदर्शन घडणवणारे हे पुस्तक आहे.
    शारीरिक काय, पण कोणतीही मोनोगँमी घातक. मोनोगमी हे मूल्याचं अनैसर्गिक.. वैचारिक मोनोगँमी देखील घातक हे विजय तेंडुलकर यांनी लेखकाला सांगितलेल वाक्य चिंतनीय आहे. तर 'मी माझ्या आजूबाजूच्या दिगग्ज आणि पुरोगामी, डाव्या उजव्या अशा दोन्ही प्रकारच्या डायनोसोर्सशी न रागावता प्रेमाने वागायला शिकलो' ह्या सारखी विधाने वाचकाला शहाणं करतात. लेखकाने भाषेच्या संदर्भात मांडलेले विचार विचारप्रवण आहेत. लेखक म्हणतो, 'भाषेचा अभिमान बाळगण्यात माणसे जितका वेळ खर्च करतात तितका भाषेच्या वापरासाठी आणि संचयनासाठी किंवा शब्दवृद्धीसाठी करत नाहीत... अनुभवाचे आकलन आणि वर्णन करायला भाषा लागते. मेंदूला विचार करायला कमावलेली भाषा लागते. आपण भाषेचा संवेदनशीलतेने विचार केला नाही तर आनंदाचे आणि अनुभवाचे पदर, त्यातील अधले - मधले रंग व्यक्त करण्याची ताकद समाज म्हणून आपण गमावून बसू, अशी चिंता लेखकाला आहे.
    'पुस्तकाचे वेड' या लेखात लेखकाने आपल्या पुस्तकाची आवड कशी निर्माण झाली हे सांगितले, यासोबतच मराठी साहित्य विषयक चिंताजनक आणि सत्य विधानं केलीत. ती अशी - 'प्रत्येक भाषेतल्या वाचकाला त्याच्या पिढीचे आणि त्याच्या वयाचे ताकदवान लेखक असतात, मी मराठी असल्याने माझ्या कपाळी हे नशीब नसावे..... मी मराठी लेखक आहे, पण मराठी वाचक आहे... माझ्या मातृभाषेतील साहित्याला भूतकाळाचे आकर्षण आहे' या विधानात थोडी अतिशयोक्ती आहे, तरीही मोजके लेखक सोडले तर मराठीत गांभीर्याने लेखन करणारे लेखक अत्यल्पच ! या लेखात लेखकाने मी काय वाचतो? आणि मी सध्या काय वाचतो यातला सूक्ष्म भेद स्पष्ट केला. अलका टॉकीज च्या परिसरात असलेल्या दाते काकांच्या पुस्तकाच्या दुकानातील सुरुवातीच्या दिवसात वाचलेली चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्स ते नंतर जीए - सुनीता देशपांडे यांची पत्र वाचत विश्व साहित्यात रमणाऱ्या लेखकाची सुमित्रा भावे, माधवी पुरंदरे, अरुण खोपकर, विजय तेंडुलकर यांनी लेखकाचा परिघ सतत ओलांडत नेला. सोबत मोठे वास्तूरचनाकार, पुस्तकांचा अफाट व्यासंग असलेले द्वारकानाथ कुलकर्णी आणि दुर्मिळ ग्रंथ वितरक शशिकांत सावंत यांनीही आपल्याला पुस्तक वाचनाची आवड लावली, असे लेखक नमूद करतो. आपल्या भाषेला केवळ अभिमान आणि आठवण उरली असून आपल्या भाषेतील साहित्य आपली भूक भागवू शकत नाही, असं लेखकाला उमजलं तेव्हा तेंडुलकर यांनी फार सुंदर उत्तर दिलं, ते म्हणाले, 'भाषा हे माध्यम आहे, साध्य नाही. मराठी भाषा अजिबातच महत्वाची नाही. आपल्या आयुष्याचा परिघ उमटवणारे, आपल्याला आतून ओले करणारे ज्या ठिकाणी असेल तिथे जाऊन ते वाच' त्यानुसार लेखकाने स्वतःची अन्न शोधायची जबाबदारी आपली आपल्यावर असते, हे लक्ष्यात घेऊन लेखक आता द लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स आणि द पॅरिस रिव्ह्यू या वेबसाईटवर उपलब्ध असलेले जगभरातील साहित्याची ओळख करून घेतो.
    'एकट्या माणसाला घर हवे' या लेखकात लेखकाने सांगितलेला अनुभव भारतीय समाजाची अविविवात माणसाकडे बघण्याची वृत्ती टिपतो. लेखक एका ठिकाणी भाड्याने राहायला जातात, मालकिणीला पैसे देतात. आणि नंतर त्या मालकीनीला कळतं की, लेखक अविवाहित आहेत. त्या सोसायटीचा नियम असतो की, केवळ कुटुंबालाच जागा द्यायची....  तेव्हा लेखकाला ती जागा सोडावी लागते. लेखक म्हणतो, लग्न केलेली जोडपी तेवढी चांगली, अन् अविवाहित वाईट असतात का ? 'गृहिणी ही संस्था आता लिंगवाचक राहिली नाही', शिवाय 'सुरक्षितता आणि शांतता हे दोन नियम पाळून जी माणसे तुमच्या आजूबाजूला राहत आहेत, अशा स्थलांतरित माणसाला आपण थोड्या मोकळ्या आणि संवेदनेने आणि चांगल्या जाणिवेने वागवू शकत नाही का?' हा प्रश्न विचार करायला भाग पाडतो. कुंडलकर एकटेपणाकडे कुठल्या दृष्टीने पाहतात, ते आपल्याला 'एकट्या माणसाला घर हवे' आणि 'एकट्या माणसांचे स्वयंपाकघर' या लेखात वाचायला मिळते.
    प्रकरण या लेखात प्रेम आणि लैंगिकता यावर भाष्य केले भारतीय समाजाची मानसिकता मांडली अतिशय खुलेपणाने कुंडलकर यांनी मांडणी केली सिनेमाचे ज्याप्रमाणे प्रीमिअर्स होता त्याचप्रमाणे माणसांची लग्न होतात... प्रेम चारचौघांमध्ये न मिरवता, कुणालाही कुणकुण लागू देण्याला आपण अफेअर्स का म्हणतो ? हा प्रश्न लेखक विचारतो. एकतर्फी प्रेमसबंधी लेखक म्हणतो, आपण नुसता घट्ट हात धरला एकदा तर दुसऱ्या व्यक्तीचा सगळा पावसाळा आनंदात जाणार असेल तर त्याला ती भेट देण्याचा मोठेपणा मनात ठेवावा..... लेखकाला आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या व्यक्तीच्या प्रेमात पडून ते निभावणार्या व्यक्ती लेखकाला धाडसी वाटतात. खऱ्या वाटतात. पण परंपराची झापडे आणि भावनिक समृद्धीच्या अभावामुळे आपण अशा नात्यांची आणि माणसांची व्यभिचारी म्हणून हेटाळणी करतो, हे शल्य लेखक मांडतो.
    या पुस्तकात दोन प्रवासवर्णने आहेत. इस्तंबूलची डायरी’, ‘पॅरिस नावाची डायरी’ ही दोन्ही  प्रवासवर्णनं सुरेख आहेतच. यातून प्रवासवर्णनातून कुंडलकर आपल्याला मस्त फिरवून आणतात. लेखक त्या शहरांचं जिवंत चित्र उभं करतात. अनेक बारीक- सारीक तपशील देतात. त्या शहरातील वास्तू, रस्ते, त्या देशातील लेखक, खान - पान, बोली, संस्कृती या विषयी तर लिहितातच पण  त्या शहरांत भेटलेल्या लोकांची संक्षिप्त, पण प्रभावी व्यक्तीचित्रंही या लेखांत आढळतात. यावरून कुंडलकर हे शहरांकडे कसे बघतात, कुठल्या गोष्टी त्यांचं लक्ष वेधून घेतात, हे कळते.  इस्तंबुलची डायरी या लेखात लेखकाने 'इस्तंबूल येथील बिएनाले, इस्तंबूल मॉडर्न आर्ट' या आधुनिक राष्ट्रीय कलासंग्रहालयविषयी तसेच 'आया सोफिया' या भव्य मशिदीविषयी लिहिलं. तर ‘शहराचे छायाचित्र’ आणि ‘सातत्याने बदलणारी शहरे’ या दोन लेखांतून कुंडलकर यांना बदलत जाणाऱ्या शहराविषयी काय वाटतं, शहरे बदलतात पण नेमकं काय बदलतं, याविषयी कुंडलकर या लेखात लिहितात. कुंडलकर लिहितात की, गेल्या काही वर्षात शहरात होणारा मुख्य बदल म्हणजे, चांगली पुस्तकांची दुकाने आणि चांगली म्युझिक स्टोअर्स बंद होणे. जसे काहीतरी संपत असते त्यापेक्षा कमी वेगाने का होईना, आजच्या काळातील नवे असे काहीतरी तयार सुद्धा होत असते.  मात्र काळानुसार बदलत्या वातावरणाचे भान ठेवून जुने जपायला हवे, असे ते म्हणतात.  आपण सुट्टी घालण्यासाठी पाश्चिमात्य देशात जातो. तिथल्या ऐतिहासिक वास्तू, शांतता आणि स्वच्छता अनुभवतो. मात्र, भारतात ह्या गोष्टीचा अनुभव निर्माण करायला आपली काही वैयक्तिक जबाबदारी आहे, हे आपल्या गावीही नसते. पाश्चिमात्य राष्ट्रांत ऐतिहासिक- सांस्कृतिक- कलात्मक वास्तू, जागा यांचे जतन करण्याचे महत्व जसे कुटुंब, शिक्षणातून पटवून दिले जाते, तसा प्रयत्न आपण करणे गरजेचे आहे, असे लेखकाला वाटते.
    'दृश्यकलेचे साक्षात्कार' या लेखात लेखक कोची येथे दर दोन वर्षानी भरणाऱ्या 'कोची म्युझिरिस बिएनाले' विषयी बोलतात. अमूर्ततेविषयी लिहीतात. आपण कुणीही कलेमधील आणि नात्यांमधील अमुर्तता समजून घेत नाही. मात्र; आपल्याला भूक असेल तर ती भूक भागवण्यासाठी आपल्या स्वतःलाच प्रयत्न करायला हवा.... साचेबद्ध डबक्याच्या वातावरणातून बाहेर पडून अमूर्तता समजून घ्यायला हवी... अंबरनाथ - कल्याण या पलीकडे जाऊन आपण आपला जीवनानुभव वाढवावा. इंग्रजी भाषा शिकून नव्या जगात घडणाऱ्या नव्या गोष्टीशी संपर्क वदवून आपला बौद्धिक विस्तार करावा, असं लेखक सांगतो. हे सगळं लेखक मोठेपणाचा कुठलाही आविर्भाव - बडेजावा न करता अतिशय समजुतीच्या स्वरात सांगतो.
    नैराश्येची सुबक नोंदवही या लेखात एकटेपणा आणि नैराश्य याबाबतचे लेखकाने वैयक्तिक अनुभवा सोबतच शारीरिक कसरत आणि शारीरिक आरोग्याची निगा राखल्याने कसे औदासिन्य दूर केले हे सांगितले. आपण ज्या समाजात राहतो त्या  समाजात नैराश्य आणि एकटेपणा ह्याकडे अतिशय आळसाने आणि अतिशय मंद बुद्धीने पाहिल्या जाते. मात्र जिथे वैचित्र्याला सामावून घेण्याची ताकत असते - संस्कृती असते तिथे एकटेपणा आणि नैराश्य याकडे पहायची आपली प्रामाणिक, आपल्याला साजेशी दृष्टी साकारायला मदत होते.... धर्मसत्ता ही भारतातील मोठी सायकीअँट्रिक आहे. रूढी - परंपरा यांना सहज बळी पडणारी माणसे नैराश्य आले की कर्मकांडे करून बुवा - बाबांच्या नादी लागून मन गुंतवण्याचा प्रयत्न करतात. मात्र याने मनाला स्थैर्य आणि भान येत नाही. तरीही हा समाज बुवा- बाबांच्या नादी लागतो, हे वास्तव लेखक मांडतो. लेखक सचिन कुंडलकर एकटेपणाकडे कुठल्या नजरेतून बघतात, ते ‘एकट्या माणसाचे स्वयंपाकघर’, ‘फिक्शन’ आणि ‘नैराश्याची सुबक नोंदवही’ हे लेखात मांडलंय. 'फिक्शन’ आणि ‘शरीर’ या लेखांमध्ये तो प्रेम, प्रेमाची शारीरिकता या संकल्पनांकडे ज्या नजरेनं पाहतो आणि ज्या लालित्यपूर्ण शैलीत मांडले असून असल्या विषयांची चर्चा मराठी साहित्यात अभावानेच झालेली दिसेल.
    कुंडलकर यांच्या लिखाणाची शैली मिश्किल आणि तिरकस असली तरीही त्यांचं लेखन लालित्यपूर्ण आहे.  कुंडलकर यांचा स्वभाव पारदर्शी, स्पष्ट आणि नितळ आहे. त्यामुळे ते थेट लिहितात. खरं ते लिहितात.  कुणाला मार्गदर्शन करण्यासाठी  लिहीत नाहीत, ना मोठेपण लिहिण्यासाठी लिहितात,  वा कुणाला डोक्यावरही घेत नाहीत.   तरीही सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, श्री. पु भागवत, तेंडुलकर या लोकांविषयीची कृतज्ञ भावना अनेक प्रसंगातून प्रांजळपणे व्यक्त होतांना दिसते. तेंडुलकर आणि चेतन दातार यांच्यावरील ‘मोनोलॉग’ आणि ‘प्राइम टाइम स्टार’ हे दोन्ही लेख म्हणजे व्यक्तीचित्रणाचे उत्तम नमुने आहेत.
    पुस्तकात पानोपानी पुस्तक, गायक, संगीतकार, चित्रपट यांचे संदर्भ येतात. यावरून या कलासक्त लेखक - दिग्दर्शकाची कलाप्रेम अधोरेखित होतं.
    सचिन कुंडलकर सध्या मराठी चित्रपटदृष्टीत कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील चित्रपट दिग्दर्शक असून चांगले लेखक आहे. त्यांच्या मौजेने प्रकाशित केलेल्या  ‘कोबाल्ट ब्लू’ या कादंबरीने ते सिद्ध केलंय.  ‘नाइन्टीन नाइन्टी’ मधील लिखाण देखील वाचकांला एक सुंदर अनुभूती देते. हे लेखन चिंतनशील, मर्मग्राही आकलन, त्यांची सुस्पष्ट मांडणी, आपली जीवनदृष्टी आणि दृष्टिकोन कायम व्यापक ठेवत वाचकांचा परिघ रुंदावते.

---------------------------------------------------
लेखक - सचिन कुंडलकर
प्रकाशन - रोहन प्रकाशन
किंमत- ३०० रुपये
पृष्ठे - २२८

- कबीर उषा लक्ष्मण बोबडे


Comments

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com