नाइन्टीन नाइन्टी : कलंदर माणसाचं जगणं !
सचिन कुंडलकर या प्रतिभावान दिग्दर्शकाचं 'नाइनटीन नाईन्टी' हे पुस्तक वाचलं. प्रस्तावनेऐवजी ‘नाइन्टीन नाइन्टी’ याच नावाच्या दीर्घ लेखाने या पुस्तकाची सुरुवात होते. या ठिकाणी कुंडलकर लिहितात की ‘प्रत्येक माणूस हा एका दशकाने घडवला जातो, ओळखला जातो’. कुंडलकर यांच्यासाठी हे काम १९९०च्या दशकाने केलं. मात्र, हे पुस्तक म्हणजे केवळ गतकाळाचे दस्तऐवजीकरण नाही. तर एक सृजनशील कलावंतांच्या विविधांगी जगण्याचं आणि आगळ्या वेगळ्या जीवनाचं एक मनोज्ञ दर्शन आहे. अष्टपैलू गुण असलेला हा माणूस मनसोक्त जगला, चित्रपटात रमला, नाटकात रंगला, साहित्यात वावरला, कधी कधी जग फिरला... आणि याच नव्वदच्या दशकाने सचिन कुंडलकर यांना सिनेमाशी जोडलं, पुण्याची वेस ओलांडून परदेशात नेलं.... तिथे नवीन भाषा शिकले ज्याद्वारे त्यांचं जगणं अधिकाधिक समृद्ध होत गेलं. परदेश फिरल्याने नवीन संस्कृतीशी - तिथल्या माणसांशी त्यांचा जवळून संबंध आल्याने आपलं जग आणि अवकाश किती छोटेखानी, मर्यादित आणि संकुचित स्वरूपाचे आहे याची त्यांना जाणीव झाली. या जाणीवेने त्यांना एक मनस्वी कलावंत आणि एक संवेदनशील माणूस म्हणून अधिक ...