राजकारण आणि स्त्रिया
निवडणुका जवळ आल्या की महिला, महिलांचा राजकारणातील सहभाग, महिला आरक्षण या चर्चेला शिळ्या कढीला उत यावा तसा ऊत येतो. आपण फक्त आणि फक्त चर्चा करतो, प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाही. खरंतर मतदार म्हणून स्त्रियांची भूमिका निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची आहेच. मात्र, त्यांनी कुणाला मत द्यावं, हे देखील त्यांच्या घरची 'पुरुष मंडळीच' ठरवतात, असं एक चित्र आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळतं. तर, शिकल्या सवरलेल्या स्त्रिया घरातल्या पुरुषांना न जुमानता खऱ्या अर्थाने आपलं मतदान हक्काचं स्वातंत्र्य जपतात. असं असलं तरीही त्यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग केवळ मतदानापुरताच न ठेवता त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात उतरले पाहिजे. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे असं चित्र होतं की, पुरुष निवडून आला की, त्याची आरती व्हायची. त्या निवडून आलेल्या पुरुषाला स्त्रीया ओवाळायच्यात. आजही हे चित्र आहे. प्रश्न हा आहे की, अजून किती दिवस स्त्रियांनी फक्त आरत्या ओवाळत राहायच्यात ? स्त्रियांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला...